खानापूर पुलाचे काम निधीअभावी अर्धवटच…

पर्यटकांसह हजारो नागरिकांची वर्दळ असलेल्या पुणे-पानशेत रस्त्यावरील खानापूर येथील पुलाचे काम 4 वर्षांपासून अर्धवट अवस्थेत आहे, त्यामुळे यंदाच्या पावसाळ्यातही पुराच्या काळात पूल पाण्याखाली बुडून पानशेत, सिंहगड भागांतील नागरिकांचा संपर्क तुटणार आहे. तसेच, या अर्धवट पुलामुळे अपघातांची संख्यादेखील वाढण्याची शक्यता आहे. कोट्यवधी रुपये खर्च करूनही खानापूर-मणेरवाडी येथील पुलाचे काम 4 वर्षांपासून अर्धवट आहे.

खड्डे, दगड-मातीत खचलेल्या पुलावरून पर्यटकांसह नागरिकांना धोकादायक प्रवास करावा लागत आहे.खानापूर-मणेरवाडी येथील मोठ्या ओढ्यावरील पुलाचे काम मात्र गेल्या काही वर्षांपासून रखडले आहे. अर्धवट पुलामुळे पावसाळ्यात पूरपरिस्थिती निर्माण होत आहे. गेल्या 3 वर्षांत अनेकवेळा पावसाळ्यात ओढ्याला पूर आल्याने पुलासह रस्ता पाण्याखाली बुडला होता. सुदैवाने दुर्घटना घडल्या नाहीत. ओढ्यात सिमेंट काँक्रीटचे स्लॅब उभे करून पूल उभारण्यात आला आहे.

मात्र, पुलाच्या दोन्ही बाजूंना संरक्षणभिंती, कठडे, भराव टाकून पुलावर डांबरीकरण, काँक्रिटीकरण करण्यात आले नाही. दरम्यान, पुलाचे काम तातडीने सुरू न केल्यास ‘रास्ता रोको’ आंदोलन करण्याचा इशारा हवेली तालुका पंचायत समितीचे माजी उपसभापती किसनराव जोरी व संतप्त नागरिकांनी दिला आहे.