लोकसभा निवडणुकीतील शेवटच्या टप्प्याचे मतदान संपल्यानंतर विविध संस्थांनी घेतलेल्या निवडणूक अंदाजातून कोल्हापुरातून श्रीमंत शाहू छत्रपती महाराज, तर हातकणंगले मतदारसंघातून शिवसेना ठाकरे गटाचे माजी आमदार सत्यजित पाटील-सरूडकर विजयी होणार असल्याचा अंदाज विविध संस्थांनी वर्तविला आहे.प्रत्यक्ष मतमोजणी मंगळवारी (ता. ४) असून, त्याच दिवशी या निकालाचे चित्र स्पष्ट होईल.देशभरात निवडणुकीसाठी सात टप्प्यांत मतदान झाले. लोकसभेसाठी मतदानाचा शेवटचा टप्पा संपल्यानंतर विविध संस्थांनी केलेल्या सर्वेक्षणाचे अंदाज जाहीर करण्यात आले.
त्यात सर्वेक्षण केलेल्या सर्वच संस्थांनी जिल्ह्यातील दोन्ही जागा महाविकास आघाडीच्या पारड्यात टाकल्या आहेत.चौरंगी लढत असलेल्या हातकणंगले मतदारसंघात ‘वंचित’ची मते सर्वच सर्वेक्षणात बेदखल करण्यात आली आहेत. २०१९ च्या निवडणुकीत या मतदारसंघात ‘वंचित’च्या उमेदवारास एक लाख २३ हजार मते पडली होती. त्यामुळे माजी खासदार राजू शेट्टी यांचा पराभव झाला होता. यावेळी माजी आमदार सत्यजित पाटील-सरूडकर यांची शिवसेना ठाकरे गटाकडून ऐनवेळी जाहीर झालेली उमेदवारी, खासदार धैर्यशील माने यांच्याविषयीची नाराजी आणि श्री. शेट्टी यांची धरसोड भूमिका असे मुद्दे मांडत सर्वेक्षण केलेल्या सर्वच संस्थांनी सरूडकर या मतदारसंघातून विजयी होतील, असा अंदाज वर्तवला आहे. पण या मतदारसंघात दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकावर कोण राहील, याचीही उत्सुकता आहे.