हातकणंगले येथे एसटी अपघात टळला….

धोकादायक वळणावर स्टेअरिंगचा रॉड तुटल्याने विहिरीत जाऊन कोसळणारी एसटी पुढची दोन्ही चाके निखळल्याने रस्त्याकडेच्या कट्ट्याला धडकून थांबली आणि बसमधील सुमारे ३५ प्रवाशांचा जीव वाचला .ही घटना एसटीच्या शनिवारी पहाटे कोल्हापूर – सांगली मार्गावर हातकणंगले पंचायत समितीजवळ घडली.याबाबत अधिक माहिती अशी, विजापूरहून कोल्हापूरकडे जात असताना.

सुमारे ३५ प्रवाशी घेऊन निघालेली एसटी आज पहाटे सव्वादोनच्या सुमारास हातकणंगले पंचायत समितीच्या पुढे आली असता अचानक एसटीच्या स्टेअरिंगचा रॉड तुटला. चालक बसवराज नावी यांना काही कळायच्या आतच एसटीची पुढील दोन्ही चाके निखळली आणि एसटी रस्त्याकडेच्या कट्ट्याला धडकून थांबली. बाजूला भली मोठी ओसाड विहीर पाहून झोपेतून अचानक जाग आलेल्या प्रवाशांना अक्षरशः दरदरून घाम फुटला होता. एसटी खाली कोसळली असती तर मोठा अनर्थ घडला असता. हातकणंगले पोलिस घटनास्थळी दाखल झाले. सर्व प्रवाशांना सुरक्षितपणे बाहेर काढून कोल्हापूरला पाठवण्यात आले.