खानापूर विधानसभा मतदारसंघात खानापूर तालुका, आटपाडी तालुका आणि विसापूर सर्कलमधील २१ गावांचा समावेश आहे. सांगली लोकसभेच्या निवडणुकीत निर्णायक भूमिकेत असलेल्या खानापूर विधानसभा मतदारसंघात भाजपचे उमेदवार खासदार संजयकाका पाटील विरूध्द अपक्ष उमेदवार विशाल पाटील विरूध्द महाविकास आघाडीचे उमेदवार पै. चंद्रहार पाटील यांच्यात तिरंगी लढत झाली.
गत निवडणुकीत संजयकाकांना मताधिक्य देणारे विटा शहर आणि खानापूर मतदारसंघातील मतदार यावेळी पुन्हा संजयकाकांना साथ देणार की अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांच्या पाठीशी राहतात ? कि स्थानिक उमेदवार म्हणून पै. चंद्रहार पाटील यांना कौल देतात ? याकडेच सर्वांचे लक्ष वेधले होते.
मात्र संजयकाका पाटील विरूद्ध विशाल पाटील यांच्यातच झालेल्या लक्षवेधी दुरंगी लढतीत खानापूर मतदारसंघातील जनतेने मात्र कौल विशाल पाटलांच्या बाजूने दिल्याचे निकालातून स्पष्ट झाले आहे. अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांच्या पाठीशी कोणताही बडा नेता नसताना खानापूर आटपाडीतून १७ हजार ७०० मतांचे तर मतदारसंघाचा केंद्रबिंदू असणाऱ्या विटा शहरातून १ हजार ७२५ एवढे मताधिक्य मिळाले. ही बाब विशाल पाटील यांच्या विजयात नोंद घेण्यासारखी ठरली आहे.
खानापूर विधानसभा मतदारसंघात लोकसभा निवडणूकीसाठी एकूण ३४७ मतदान केंद्रावर १ लाख ९६ हजार १६५ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता. झालेल्या मतदानाची टक्केवारी ५८. १५ टक्के इतकी होती.
खानापूर मतदारसंघात जो उमेदवार मताधिक्य अधिक घेईल तोच निवडणुकीत बाहुबली ठरणार ? असा राजकीय निरीक्षकांचा अंदाज होता. खानापूर मतदारसंघातील सर्वच प्रमुख राजकीय पक्षांचे नेते खासदार संजयकाका पाटील यांच्यासोबत होते. त्यामुळे या मतदारसंघात महायुतीची ताकद मोठी होती. त्यामुळे लोकसभा निवडणुकीत खानापूर मतदारसंघातून कोण मताधिक्य घेणार ? याकडे सर्वांचे लक्ष लागले होते.