कोल्हापूर व हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील ५० पैकी तब्बल ४६ उमेदवारांची अनामत रक्कम जप्त झाली आहे. निवडणूक आयोगाच्या नियमांनुसार वैद्य मतांपैकी १/६ म्हणजेच १६.६७ टक्के मते मिळाली पाहिजेत.तरच अनामत रक्कम वाचते; पण या निवडणुकीत प्रमुख चार उमेदवार वगळता सगळ्यांना आपली अनामत वाचवता आलेली नाही. विशेष म्हणजे राजू शेट्टी, डी. सी. पाटील यांनाही अनामत रक्कम राखता आलेली नाही. निवडणूक आयोगाच्या नियमांनुसार, कोणत्याही निवडणुकीत उमेदवाराला एकूण वैध मतांपैकी १/६ म्हणजेच १६.६७ टक्के मते मिळाली नाहीत, तर त्याचे डिपॉझिट जप्त केलं जातं.
एखाद्या उमेदवाराला १६.६७ टक्क्यांपेक्षा जास्त मते मिळाल्यास त्याचं डिपॉझिट त्याला परत केलं जातं. एखाद्या उमेदवाराने उमेदवारी अर्ज मागे घेतल्यास किंवा कोणत्याही कारणास्तव त्याची उमेदवारी रद्द झाल्यास, त्याने जमा केलेलं डिपॉझिट परत दिलं जातं. याशिवाय विजयी उमेदवारांनासुद्धा डिपॉझिट परत मिळतं.या लोकसभा निवडणुकीत कोल्हापूर मतदारसंघातून काँग्रेसचे शाहू छत्रपती, शिंदेसेनेचे संजय मंडलिक या प्रमुख उमेदवारांसह २३ जण रिंगणात होते.
तर ‘हातकणंगले’ मतदारसंघात शिंदेसेनेचे धैर्यशील माने, उध्दवसेनेचे सत्यजित पाटील, स्वाभिमानीचे राजू शेट्टी यांच्यासह तब्बल २७ जण रिंगणात हाेते. कोल्हापूर मतदारसंघात १३ लाख ८६ हजार २३० मते झाली होती. निवडणूक आयोगाच्या नियमानुसार पराभूत उमेदवारांना किमान २ लाख ३१ हजार ८४ मते मिळणे गरजेचे होते. शाहू छत्रपती व संजय मंडलिक वगळता इतर एकही उमेदवार जवळपासही पोहचलेला नाही.
हातकणंगलेत १२ लाख ९० हजार ७३ मते झाली, त्यानुसार किमान २ लाख १५ हजार ५५ मते मिळणे बंधनकारक आहे. विशेष म्हणजे कोल्हापूरमध्ये प्रमुख दोन ‘हातकणंगले’ मतदारसंघातील प्रमुख तीन उमेदवारानंतर नोटाला मते अधिक मिळाली आहेत.