Lok Sabha Election Result 2024: मोठी बातमी! पंतप्रधान मोदींचा राजीनामा राष्ट्रपतींकडून मंजूर!

लोकसभा निवडणुकीत एनडीएला (NDA) बहुमत मिळालं असून पंतप्रधान नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधानपदी विराजमान होणार आहेत. अशातच एनडीएनं सत्ता स्थापन करण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत. येत्या 8 जून रोजी नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेण्याची शक्यता आहे. त्या अनुषंगानं एनडीएनं पावलं उचलण्यास सुरुवात केली आहे.

अशातच नरेंद्र मोदींनी आपल्या आज (5 जून) पंतप्रधान पदाचा राजीनामा दिला आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी पंतप्रधान मोदींचा राजीनामा मंजूर केला असून मोदी आतापासून काळजीवाहू पंतप्रधान म्हणून जबाबदारी सांभाळणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी राष्ट्रपती भवनात दाखल झाले आणि त्यांनी पंतप्रधान पदाचा राजीनामा राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडे सुपूर्द केला. राष्ट्रपती मुर्मूंनी हा राजीनामा स्विकारला असून आजपासून मोदी देशाचे काळजीवाहू पंतप्रधान म्हणून पदावर कायम राहणार आहेत. एनडीए बैठकीआधी लोकसभा भंग करण्याची औपचारिक माहिती देण्यासाठी पंतप्रधान मोदी राष्ट्रपती भवनात दाखल झाल्याचं कळतंय. 

शुक्रवारी (7 जून) दुपारी 2.30 वाजता संसद भवनात एनडीएच्या खासदारांची बैठक होणार असल्याचंही सूत्रांनी सांगितलं आहे. या बैठकीला एनडीए शासित राज्यांचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि विविध पक्षांचे अध्यक्ष उपस्थित राहणार आहेत. दुसऱ्या दिवशी म्हणजेच 8 जून रोजी नरेंद्र मोदी सलग तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेऊ शकतात. हा शपथविधी कार्यक्रम संध्याकाळी 7 ते 8 दरम्यान होऊ शकतो.