मान्सूनचे आगमन महाराष्ट्रात झाले आहे. काही ठिकाणी मुसळधार तर काही ठिकाणी रिमझिम पाऊस सुरु आहे. पण पावसामुळे नागरिकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. असाच प्रकार वाळवा तालुक्यातील गोटखिंडी येथे सतत विजेचा खेळखंडोबा सुरू आहे. वादळ वारे कमीच असते तरीही वीज गायब होत असते.
मंगळवारी सायंकाळी पावसाला सुरुवात झाली; पण किरकोळ वारं सुटले आणि वीज बंद झाली, ती रात्री उशिरा आली. बुधवारी दुपारी २ वाजता वीज गायब झाली ती रात्री आली. आठवडी बाजार, दुपारी ४ वाजेनंतर रिमझिम पाऊस त्यात वीज नसल्याने बाजारात व्यापारी व ग्राहकांची त्रेधातिरपीट उडाली. गोटखिंडीला विद्युत पुरवठा हा पडवळवाडी, अहीरवाडी, गाताडवाडी, लोणारवाडीमार्गे असा नऊ किलोमीटरवरून होतो. किरकोळ कारणावरूनही विद्युत पुरवठा खंडित होतो. यासाठी विद्युत वितरण कंपनीने विद्युत पुरवठा सुरळीत करण्यासाठी ठोस कार्यवाही करणे गरजेचे आहे.