द्राक्ष दलालांकडून शेतकर्‍यांची 75 लाखांची फसवणूक, सहा जणांवर गुन्हा दाखल….

पलूसमधील शेतकर्‍यांची द्राक्ष दलालांनी 75 लाख 40 हजारांची फसवणूक केल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये सहा दलालांविरोधात पलूस पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.द्राक्ष दलालांकडून पलूसमधील गंजीखाना, शिवाजीनगर या भागातील शेतकर्‍यांची 17 लाख 46 हजार हजार रुपयांची फसवणूक झाली आहे. याप्रकरणी अमोल दिनकर डुबल (रा. कुंडल), गणेश लक्ष्मण जगताप (रा. कुंभारगाव) व राहुल सुधीर कोले (रा. वाळवा, ता. वाळवा) या दलालांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.

याबाबत जयवंत शंकर मोहिते (वय 47, रा. मोरे आड तालीम शेजारी, पलूस) या शेतकर्‍याने फिर्याद दिली आहे. दुसर्‍या प्रकरणात विद्यानगर भागातील शेतकर्‍यांची 57 लाख 94 हजारांची फसवणूक झाली आहे. याप्रकरणी दलाल प्रतीक राजेंद्र कोल्हे, अभिजित बबन मगदूम व व्यापारी राहुल सुधीर कोल्हे (सर्व रा. वाळवा) यांच्याविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे. याबाबत शेतकरी अमोल वसंतराव पाटील (वय 47, रा. विद्यानगर, पलूस) यांनी पलूस फिर्याद दिली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार तक्रारदार जयवंत मोहिते यांच्यासह गंजीखाना, शिवाजीनगर भागातील 4 शेतकर्‍यांकडून एप्रिल 2023 च्या हंगामात अमोल डुबल, गणेश जगताप यांनी द्राक्षे खरेदी केली. त्यांची बाजारपेठेत विक्री केली. परंतु शेतकर्‍यांचे पैसे दिले नाहीत. शेतकर्‍यांनी वारंवार पैशाचा तगादा लावल्यानंतर राहुल कोले या दलालाच्या बँक खात्याचे 17 लाख 46 हजार रुपयांचे वेगवेगळे धनादेश दिले. परंतु खात्यावर पैसे नसल्याने हे धनादेश वठले नाहीत. धनादेश न वठल्याने तसेच वारंवार पाठपुरावा करूनही पैसे मिळत नसल्याने शेतकर्‍यांनी फसवणुकीची फिर्याद दिली आहे.

दुसर्‍या घटनेत विद्यानगर भागातील अमोल पाटील यांच्यासह 13 शेतकर्‍यांची प्रतीक कोल्हे, अभिजित मगदूम, राहुल कोल्हे या दलाल व व्यापार्‍यांनी फसवणूक केली. द्राक्ष माल घेऊन त्यांची विक्री केली, परंतु अमोल पाटील यांच्यासह शेतकर्‍यांच्या द्राक्षांचे पैसे दिले नाहीत. वारंवार पाठपुरावा केल्यानंतर प्रतीक कोल्हे व अभिजित मगदूम यांनी व्यापारी राहुल कोल्हे याच्या बँक खात्यावरील 52 लाख 66 हजार रुपयांचे वेगवेगळे धनादेश अमोल पाटील यांच्यासह इतर शेतकर्‍यांना दिले. परंतु हे धनादेश वठले नाहीत.

यानंतर पाटील यांच्यासह शेतकर्‍यांनी कोल्हे व मगदूम यांच्याकडे पैशाची मागणी केली असता त्यांनी अरेरावीची भाषा केली. तुम्ही आमच्याकडे पैसे मागण्यास आला तर आम्ही विषारी द्रव्य प्राशन करून आत्महत्या करू. तुमची नावे चिठ्ठीत लिहून ठेवू अशी धमकी दिली. याशिवाय फिर्यादी तसेच इतर दोन शेतकर्‍यांची 5 लाख 28 हजारांची द्राक्षे घेऊन त्यांना तोंडी पैसे देतो, असे सांगितले होते. त्यांचीही फसवणूक झाली. सुमारे 57 लाख 94 हजारांच्या फसवणूकप्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल झाला आहे.

दोन्ही तक्रारदार व शेतकर्‍यांनी शनिवारी पलूस पोलिस ठाण्यात फसवणुकीची फिर्याद दिली आहे. त्यानुसार ऐकून 75 लाख 40 हजारांच्या फसवणूकप्रकरणी सहा जणांवर गुन्हा दाखल झाला आहे. अधिक तपास सुरू आहे.