वाळवा तालुक्यातून एक अंधश्रद्धेचे प्रकार उघडकीस आला आहे. ढवळी (ता. वाळवा) येथील घरातील बाळू मामा मंदिरात दरबारात नागाच्या रूपात देव प्रकटल्याचे सांगून त्याची पूजा करून खेळ करणारा पुजारी जितेंद्र उर्फ विशाल बबन पाटील (रा. ढवळी, ता. वाळवा) वनविभागाने ताब्यात घेतले आहे. अंनिसच्या कार्यकर्त्यांनी वनविभागाकडे तक्रार केल्यानंतर या प्रकरणाचा भांडाफोड झाला. जितेंद्र हा दरबार भरवून लोकांना लुटत असल्याची तक्रार ही अंनिसने आष्टा पोलिसांत केली आहे.जितेंद्र याने त्याच्या जुन्या घरात मंदीर स्थापले आहे. सोमवारी सायंकाळी मंदिरातील दरबारात नाग रुपात देव प्रकटल्याची अफवा पसरवली.
देवळात नागरिकांची गर्दी होऊ लागली. काहींनी नागावरती हळदीकुंकू वाहिले, नागाची पूजा केली. काहींनी नागाचा फोटो, व्हिडिओ काढून समाज माध्यमावर व्हायरल केला. अंनिसच्या कार्यकर्त्यांनी हे व्हिडिओ, फोटो वनविभागाकडे पाठवले. वनक्षेत्रपाल एकनाथ पारधी यांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली. मात्र, कारवाईचा सुगावा लागताच जितेंद्र याने तेथून पलायन केले. जितेंद्र याला नागाव रस्त्यावर नागासह पकडले. जितेंद्र याच्या विरोधात वन्यजीव संरक्षण कायदा १९७२ नुसार गुन्हा दाखल केला.
देव स्वप्नात आल्याची खोटी बतावणी करून जितेंद्र याने बुवाबाजी सुरू केली आहे. दर गुरुवारी, रविवारी, अमावास्या, पौर्णिमाला घरामध्ये दरबार भरवतो. लोकांना करणी काढणे, भानामती करणे, भुतबाधा काढणे, मुल होण्यासाठी दैवी उपाय सांगणे, देवाला कौल लावणे हे अंधश्रद्धेचे प्रकार जितेंद्र करत असतो, अशी तक्रार अंनिसचे राहुल थोरात, शंकर माने, डॉ. संजय निटवे, आशा धनाले, शशीकांत बामणे यांनी आष्टा पोलिस ठाण्यात केली आहे.