कोल्हापूर जिल्ह्यात मागच्या दोन महिन्यात महसूलमध्ये सुरू असलेल्याा काळाबाजारावर जिल्हा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने चांगलाच अंकुश लावला आहे. दोन महिन्यात शेतकऱ्यांना लुबाडणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना रंगेहाथ पकडण्यात यश आलं आहे.मागच्या आठ दिवसांपूर्वी महसूलमधील वरिष्ठ कारकुनला लाच घेतल्याचे प्रकरण ताजे असताना आता पुन्हा एका तलाठ्याला पकडण्यात यश आलं आहे. शेत जमिनीच्या डायरी उताऱ्यावर हक्कसोड पत्राप्रमाणे नाव नोंदणी करून डायरी उतारा देण्यासाठी मध्यस्थामार्फत पाच हजारांची लाच मागितल्याप्रकरणी जैन्याळ-मुगळी येथील तलाठ्यावर काल लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई केली.
विभागाने या प्रकरणी तलाठी प्रदीप अनंत कांबळे (वय ३२, सध्या रा. मुरगूड, ता. कागल, मूळ तरसंबळे, ता. राधानगरी) व मध्यस्थ गणपती रघुनाथ शेळके (४६, रा. जैन्याळ, ता. कागल) यांना ताब्यात घेतले. या संदर्भातील गुन्हा मुरगूड पोलिस ठाण्यात नोंद आहे.या संदर्भात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दिलेली माहिती अशी, या प्रकरणात मुगळी गावातील तक्रारदार आहेत.
त्यांच्या शेत जमिनीचे हक्क सोडपत्राप्रमाणे शेत जमीन डायरी उताऱ्यावर नाव नोंदणी करावी आणि डायरी उतारा द्यावा, अशी मागणी त्यांनी लेखी केली होती. या कामासाठी मध्यस्थ शेळकेने तलाठी प्रदीप कांबळे याच्यासाठी पाच हजार रुपये लाच मागितली. तलाठी कांबळे याने शेळकेने मागितलेले पाच हजार रुपये एका मंडल अधिकाऱ्याकडे देण्यास तक्रारदारास प्रोत्साहन दिल्याचे तपासात निष्पन्न झाल्याने पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.