वैभव पाटील यांनी खानापूर विधानसभेसाठी फुंकले रणशिंग…..

नुकतीच लोकसभा निवडणूक पार पडली. पण लगेचच आता विधानसभा निवडणुकीच्या तयारीला अनेक नेतेमंडळीनी आपापली उस्तुकता दाखविण्यास सुरुवात केली आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत लोकसभेत या मतदारसंघात अपक्ष विशाल पाटील यांना मतदारसंघातील मतदारांनी १६ हजार ६०० चे मताधिक्य देत भाजपचे संजय पाटील यांना धक्का दिला.

पराभवाला सामोरे जावे लागले असतानाच आता भाजपचा मित्र पक्ष असलेल्या अजितदादा पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने खानापूर विधानसभा मतदारसंघात मैदानात उतरण्याची घोषणा केली आहे. राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अॅड. वैभव पाटील यांनी आगामी विधानसभा निवडणुकीत खानापूर मतदारसंघातून निवडणूक लढविण्याचा निर्णय जाहीर केल्याने महायुतीच्या नेत्यांच्या अडचणीत पुन्हा एकदा वाढ होण्याचे संकेत आहेत.

दिवंगत अनिल बाबर यांचे सुपुत्र जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुहास बाबर यांनाच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उमेदवारी देतील अशी शक्यता आहे. तरीही या मतदारसंघात महायुतीत मित्र पक्ष असलेल्या अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष वैभव पाटील यांनी खानापूर मतदारसंघात रणशिंग फुंकल्याने महायुतीतील नेते मंडळींची डोकेदुखी वाढणार आहे.