मान्सूनने निम्मा महाराष्ट्र व्यापला असून मुंबई पुण्यासह तो आता नाशिक, छत्रपती संभाजीनगर आणि विदर्भातील काही भागात जाऊन पोहचला आहे. त्यामुळे संपूर्ण राज्यात पावसासाठी पोषक वातावरण तयार झालं आहे.आज हवामान खात्याने कोकण आणि उत्तर महाराष्ट्र तसेच मराठवाड्याला पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. कोकणात पावसाचा जोर वाढणार असून येत्या १३ जूनपर्यंत अतिवृष्टी होईल, असं आयएमडीने म्हटलं आहे.
मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस होईल, असा अंदाजही वर्तवण्यात आला आहे. शेतकऱ्यांनी पेरणीपूर्वीची सर्व कामे आटोपून घ्यावी. तसेच जमिनीत ६ इंच ओल जाईपर्यंत पेरणीचा निर्णय घेऊ नये, असा सल्लाही देण्यात आला आहे. गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा मान्सून दोन दिवस आधीच महाराष्ट्रात दाखल झाला. मुंबईतही दोन दिवसांपूर्वीच मान्सूनचं आगमन झालं. आता हळुहळू मान्सून पुढे सरकत असून आहे.
येत्या दोन ते तीन दिवसांत मान्सून संपूर्ण महाराष्ट्राला व्यापणार, असा अंदाज देखील हवामान खात्याने वर्तवला आहे. दरम्यान, राज्यातील अनेक भागात आज मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. आज मुंबई पुण्यासह, ठाणे, पालघर तसेच कोकणातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्याला पावसाचा अलर्ट जारी करण्यात आला आहे. मध्य महाराष्ट्रातील नगर, नाशिकमध्ये जोरदार पावसाचा अंदाज आहे. मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, बीड, धाराशिव, जालना जिल्ह्यात मुसळधार पाऊस होईल. विदर्भातही पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.