मंत्रिमंडळ विस्तारात कोणाला संधी? मंत्रीपदासाठी ही नावे आघाडीवर…..

राज्यात महायुतीला आलेल्या अपयशाच्या पार्श्वभूमीवर विधानसभेला ताकदीने सामोरे जाण्यासाठी मंत्रीमंडळ विस्ताराचे गाजर पुढे करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. पावसाळी अधिवेशापूर्वी हा विस्तार होण्याची चिन्हे आहेत. यामध्ये दक्षिण महाराष्ट्रातून जनसुराज्य शक्ती पक्षाचे विनय कोरे, भाजपचे सहयोगी सदस्य प्रकाश आवाडे, शिवसेनेचे राजेंद्र पाटील यड्रावकर व सांगलीचे गोपीचंद पडळकर यांची नावे आघाडीवर आहेत. तीन महिन्यातच महायुतीला विधानसभेला सामोरे जावे लागणार आहे.

लोकसभा निवडणुकीत भाजप आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाला मोठे अपयश आले. मुख्यमंत्री शिंदेंच्या शिवसेनेला पन्नास टक्के यश मिळाले. राज्यात महाविकास आघाडीची हवा असल्याचे चित्र लोकसभेत दिसले. यामुळे विधानसभेला सामोरे जाण्यासाठी तातडीने काही बदल करण्याचा निर्णय महायुतीने घेतला आहे. त्याचाच एक भाग म्हणून मंत्रीमंडळ विस्तार, महामंडळ नियुक्ती व दुसऱ्या फळीतील नेत्यांना पदे देण्यात येणार आहेत. दक्षिण महाराष्ट्रात सध्या शंभूराजे देसाई, हसन मुश्रीफ व सुरेश खाडे हे तिघे मंत्री आहेत. तिघेही कॅबीनेट मंत्री आहेत.

या पदासाठी कोरे, आवाडे, यड्रावकर, प्रकाश आबिटकर, सुधीर गाडगीळ व पडळकर हे इच्छूक आहेत. हातकणंगले लोकसभेचे खासदार धैर्यशील माने यांच्या विजयात कोरे व आवाडे यांचा मोलाचा वाटा होता. त्यामुळे त्याचे बक्षीस दोघापैकी एकाला मिळण्याची चिन्हे आहेत. नाराज धनगर समाजाला खुष करण्यासाठी पडळकर यांचा विचार होऊ शकतो. दुसऱ्यांदा निवडून आलेले आबिटकर हे मंत्रीपदाचे प्रमुख दावेदार होते. पण, लोकसभा निवडणुकीत त्यांच्या मतदार संघात विरोधकांना मोठे मताधिक्य मिळाले. यामुळे त्यांचे नाव मागे पडण्याची शक्यता जास्त आहे.