सोलापूर लोकसभेच्या निवडणुका संपल्यानंतर सोलापुरात आणि राज्यात विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत. सोलापूर शहर आणि जिल्ह्यातील ११ विधानसभा मतदारसंघात सर्वच राजकीय पक्षाच्या नेत्यांनी हालचाली सुरू केल्या आहेत. महाविकास आघाडीच्या नेत्या प्रणिती शिंदें सोलापूर शहर मध्यच्या तीन वेळा आमदार होत्या. लोकसभा निवडणुकीत प्रणिती शिंदे आमदार असलेल्या मध्य विधानसभा मतदारसंघातून फक्त ७०९ मतांची आघाडी होती.
महायुतीचे उमेदवार राम सातपुते यांनी प्रणिती शिंदेंच्या होम पिचवर जबरदस्त टक्कर दिली.आगामी विधानसभा निवडणुकीत सोलापूर शहर मध्य, दक्षिण सोलापूर, सांगोला, मोहोळ, करमाळा शिंदे गटाचे आमदार मोठ्या मताधिक्याने निवडून येतील, असा विश्वास शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाध्यक्ष मनीष काळजे यांनी व्यक्त केला आहे. लोकसभा निवडणुकीत सोलापूर शहर मध्य विधानसभा मतदारसंघावर महाविकास आघाडीला मोठी अपेक्षा होती.
सोलापूर शहर मध्य विधानसभा मतदारसंघातून प्रणिती शिंदें या २००९ पासून तीन वेळा आमदार आहेत. या मतदारसंघातून प्रणिती शिंदे पन्नास हजार मतांचं मताधिक्य घेतील, असे म्हटले जात होते. मतमोजणी झाल्यानंतर शहर मध्य विधानसभा मतदारसंघातून प्रणिती शिंदे फक्त ७०९ मतांची आघाडी घेऊ शकल्या. महायुतीचे उमेदवार राम सातपुतेंना झालेला मतदान पाहून महायुतीचे नेते ऍक्टिव्ह झाले आहेत.