वातावरणात बदल झाल्यानंतर संसर्गजन्य आजार वाढू लागतात. हे आजार वाढल्यानंतर अनेकांना सर्दी, खोकला किंवा इतर आरोग्यासंबंधित समस्या जाणवतात. पावसामुळे उन्हापासून नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला आहे. बदलत्या वातावरणाचे परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर दिसून आले आहेत.
पावसाळ्यात सर्दी, खोकला, ताप यांसारखे संसर्गजन्य आजार सगळीकडे पसरले आहेत. पावसाळ्याच्या दिवसांमध्ये आरोग्याची योग्य ती काळजी घेणे आवश्यक आहे. संसर्गजन्य रोगांमध्ये लहान मुले आणि वयस्कर वृद्ध यांना लगेच संसर्ग होतो.
त्यामुळे लहान मुलांची योग्य ती काळजी घेणे गरजेचे आहे. पावसाळ्यामध्ये रोगप्रतिकारशक्ती कमकुवत होत जाते. आज आम्ही तुम्हाला पावसाळ्यात आरोग्याची काळजी कशी घ्याची याबद्दल काही महत्वाच्या टिप्स सांगणार आहोत.
घर स्वच्छ ठेवा
पावसाळ्याच्या दिवसांमध्ये सगळीकडे मोठ्या प्रमाणावर घाण पसरते. त्यामुळे जंतू वाढू लागतात. अनेक प्रकारच्या विषाणूंपासून शरीराचे नुकसान होऊ नये म्हणून आपले घर स्वच्छ ठेवावे. जेणेकरून घरात डास किंवा इतर जंतू येणार नाहीत. घरामध्ये बुरशी किंवा बुरशीजन्य पदार्थ साठवून ठेवू नये. घरात स्वच्छ आणि खेळती हवा असावी.
संतुलित आहार घेणे
पावसाळ्याच्या दिवसांमध्ये बाहेर पदार्थ खाणे टाळले पाहिजे. अतिप्रमाणात बाहेरचे पदार्थ खाल्याने आजारी पडण्याची शक्यता असते. या दिवसांमध्ये शरीराला ऊर्जा हवी असते. त्यामुळे सकस आणि संतुलित आहार घेणे गरजेचे आहे. पावसाळ्यात भरपूर फळे, भाज्या, कडधान्य नि इतर पौष्टीक पदार्थाचे सेवन केले पाहिजे.
घराच्या आसपास पाणी जमा होऊ न देणे
पावसाळ्यामध्ये घराच्या आजूबाजूला किंवा इतर ठिकाणी पाणी साचू देऊ नये. पाणी साचल्यानंतर डेंग्यू किंवा मलेरियाचे डास पाण्यात तयार होण्याची शक्यता असते. पाणी असलेल्या ठिकाणी डास मोठ्या प्रमाणावर असतात.
लसीकरण करणे
पावसाळ्यामध्ये लसीकरण करणे आवश्यक आहे. या दिवसांमध्ये संसर्गजन्य आजार वाढू लागतात. त्यामुळे लसीकरण करून पावसाळ्यात होणाऱ्या आजारांपासून वाचता येते.