प्रशांत परिचारकांचा गावभेट दौरा सुरु, आमदार आवताडेंचं वाढलं टेन्शन! तुतारीची उमेदवारी कोणाला मिळणार?

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघात राजकीय घडामोडींना वेग आला आहे.विधान परिषदेचे माजी आमदार प्रशांत परिचारक हे अपक्ष किंवा तुतारी घेऊन निवडणूक रिंगणात उतरणार हे जवळपास निश्चित झालं आहे. आजपासून प्रशांत परिचारक यांनी गाव भेट दौऱ्याला सुरुवात देखील केली आहे. त्यांच्या या दौऱ्याला कार्यकर्त्यांचा मोठा प्रतिसाद मिळत असल्याचं दिसत आहे. यामुळं भाजप आमदार समाधान अवताडे यांचं टेन्शन वाढल्याचं बोललं जात आहे.

पंढरपूर व मंगळवेढा या दोन्ही तालुक्यातून कार्यकर्त्यांनी तुतारी किंवा अपक्ष रिंगणात उतरायचा आग्रह धरल्याने परिचारक यांनी गाव भेट दौरा सुरु केला आहे. दोन दिवसापूर्वी देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजप आमदार समाधान अवताडे यांनी आयोजित केलेल्या मेळाव्यास परिचारक अनुपस्थित राहिले होते. या मेळाव्यात विद्यमान आमदार समाधान अवताडे यांनी मोठे शक्ती प्रदर्शन करीत आपली ताकद पक्षाला दाखवून दिली होती. त्यामुळं याच मेळाव्यात फडणवीसांनी आमदार समाधान अवताडे यांना ताकद देण्याचे आवाहन केल्याने परिचारक समर्थक नाराज झाले होते.

दरम्यान, आता प्रशांत परिचारक यांनी पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघात उतरण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. त्यामुळं भाजप आमदार समाधान अवताडे यांच्या अडचणी वाढणार आहेत. सध्या पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातून भाजपकडून समाधान आवताडे तर महाविकास आघाडी कडून भगीरथ भालके किंवा अनिल सावंत या दोघांची नावे चर्चेत आहेत. अशातच आता परिचारकही रिंगणात उतरण्याच्या तयारीत आल्याने तुतारीची उमेदवारी कोणाला मिळणार? याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे.