उन्हाळी सुटीनंतर उद्या शनिवारी १५ जून रोजी शाळांची पहिली घंटा वाजणार आहे. मंगळवेढा तालुक्यातील १२ हजार ६९३ विद्यार्थ्यांचा पहिलीच्या वर्गात प्रवेश होणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांसह पालकदेखील प्रवेश घेण्यापासून ते आपल्या पाल्यांच्या शालेय साहित्याची खरेदी करण्यात मग्न होते.
शासनाने शाळापूर्व तयारी म्हणून पहिले पाऊल या नावाने विद्यार्थ्यांना हसतमुख शाळेत येता यावे तसेच त्याला शाळेचा परिचय होऊन शाळेची गोडी लागावी यासाठी पहिले पाऊल हा उपक्रम राबवण्यात येणार आहे. त्यामुळे तालुक्यात जवळपास २ हजार ६९३ विद्यार्थ्यांचे पहिलीच्या वर्गात पहिले पाऊल पडणार आहे. दरम्यान, तालुक्यातील २४९ शाळांमधील २९ हजार ६२८ विद्यार्थ्यांना पहिल्या दिवशी मोफत पाठ्यपुस्तकांचे वाटप होणार आहे.
शहर व तालुक्यातील सर्व शाळांमध्ये प्रवेशोत्सवाची तयारीही पूर्ण झाली आहे. अतिशय उत्साहवर्धक वातावरणात विविध उपक्रम राबवून गुलाबपुष्प देऊन, खाऊ वाटप करून विद्यार्थ्यांचे स्वागत केले जाणार आहे. त्यामुळे शाळेचा पहिला दिवस हा विद्यार्थ्यांसाठी अविस्मरणीय असेल. काही ठिकाणी बैलगाडी सजवून तर काही ठिकाणी पारंपरिक वाद्यांच्या गजरातही स्वागताची तयारी सुरू आहे. नवप्रवेशित बालकांना शाळेची गोडी लागावी या उद्देशाने शिक्षण विभाग पहिले पाऊल म्हणून हा उपक्रम राबवत आहे.