सांगोल्यातील या पुलाचा भाग पाण्याबरोबर प्रवाहित! वाहतूक विस्कळीत…

सांगोला तालुक्यात मागील आठवड्यापासून मृगनक्षत्राचा सर्वदूर पाऊस कोसळत असल्यामुळे कोरडा
अप्रूका माण नद्यांना तसेच ग्रामीण भागातील ओढ्या-नाल्यांतून पाण्याच्या प्रवाहामुळे रस्ते व पुलावरील रस्ते वाहून गेले. घेरडी रोडवरील तसेच मेडशिंगी- आलेगाव रोडवरील वाहतूक विस्कळीत झाली आहे. ग्रामस्थांची गैरसोय झाली आहे.

या पावसामुळे अप्रूका नदीला पूर आला आहे. सांगोला ते जुना मेडशिंगी रोड व पुलाचा काही भाग पाण्याच्या प्रवाहामुळे वाहून गेला आहे. त्यामुळे मेडशिंगी ग्रामस्थांची गैरसोय झाली आहे. दरम्यान, पावसाने उसंत घेताच जुना मेडशिंगी – सांगोला रस्त्यासह वाहून गेलेल्या पुलाची दुरुस्ती केली जाईल, असे सार्वजनिक बांधकाम अभियंता अशोक मुलगीर यांनी सांगितले.

मृग नक्षत्राच्या पावसामुळे सांगोला तालुक्यातील अनुका नदीवरील सांगोला – जुना मेडशिंगी रोडसह पुलाचा काही भाग प्रवाहाबरोबर वाहून गेला तसेच किडेबिसरी पाचेगाव बुद्रुक, घेरडी, पारे येथील धाब्याच्या घराच्या भिंती कोसळून नुकसान झाले. मात्र, सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. सांगोला महूद रेल्वे गेट ३१ बी च्या दुतर्फा काँक्रिटीकरण रस्ता अनेक ठिकाणी उखडल्यामुळे नुकसान झाले आहे.