सांगलीच्या आटपाडी तालुक्यामध्ये गुरुवारी दुपारी जोरदार पाऊस झाला. या पावसामुळे मापटेमळा येथील पुलावरून पाणी वाहत होते. याचवेळी दुचाकी वरून घराकडे जात असलेले किसन माळी हे वृद्ध पाण्याच्या प्रवाहाने वाहून चालले होते.सांगली (Sangli) जिल्ह्यातील आटपाडी तालुक्यात गुरुवारी दुपारी पावसाचे वातावरण निर्माण होत आभाळ भरून आले होते.
दुपारनंतर मात्र पावसाने जोरदार आटपाडी तालुक्यातील पश्चिम भागात हजेरी लावण्यास सुरवात केली होती. पाऊस थोडा ओसरल्यानंतर आटपाडी येथे पंचायत समितीच्या शेजारी असलेली चहाची टपरी बंद करून दुचाकीवरून किसन माळी हे मापटेमळा येथील घरी चालले होते. जोरदार (Rain) पाऊस झाल्याने मापटेमळा येथील पुलावरून पाणी वाहत होते.
पाऊसही त्याच वेळी सुरू झाल्याने किसन माळी यांना पाण्याचा व प्रवाहाचा अंदाज न आल्याने त्यांनी मोटारसायकल पाण्यात घातल्याने पाण्याच्या प्रवाहाने मोटारसायकल वाहून चालली होती.या ठिकाणी उपस्थित असलेल्या युवकांनी तात्काळ पुलाकडे धाव घेत अगदी पुलाच्या दुसऱ्या टोकाला गेलेल्या किसन माळी यांना पकडत त्यांना वाहून जाण्यापासून वाचवले.
पाण्याचा वेग व प्रमाण वाढल्याने त्यांना बाहेर काढताना युवकांना मोठी कसरत करावी लागली. मात्र आपल्या जीवाची पर्वा न करता युवकांनी वृद्ध किसन माळी यांना वाचविल्याने त्यांचे कौतुक होत आहे.