अलीकडच्या काळात अनेक भागात रस्त्यांची दुरवस्था झालेली आपणाला बघायला मिळत आहे. अशातच पावसामुळे खड्यात रस्ते की रस्त्यात खड्डे आहेत असा प्रश्न उभा राहतो. अनेक वर्ष प्रलंबित असणाऱ्या सांगली-पेठ या महामार्गाचे काम सुरू झाले. या कामाने वेगही घेतला, परंतु नियोजनाअभावी या रस्त्यावरून जाणाऱ्या वाहनधारकांचे सध्या मोठे हाल सुरू आहेत. हा रस्ता करत असताना एका बाजूचे काम सुरू ठेवून वाहनधारकांना पर्यायी रस्त्याची सोय करणे गरजेचे असताना दोन्ही बाजूंकडील रस्ता उकरल्याने वाहनधारकांना याचा मोठा फटका बसत आहे. आष्टा ते सांगलीदरम्यान दोन्ही बाजूंनी रस्ता खोदला असून रस्त्यातील उंचवट्यामुळे अपघातास निमंत्रण मिळत आहे.
आष्ट्यापासून महामार्गाचे काँक्रीटीकरणाचे काम सुरू करण्यात आले. मिरजवाडीपर्यंत मार्गिकेचे काम पूर्ण झाले आहे. आष्टा ते सांगली यादरम्यान या कामाने वेग घेतला असून, पावसाळ्यातही हे काम अविरत सुरू आहे. रस्त्याच्याखाली पाण्यासाठी मोठे पाइप टाकले आहेत. त्याठिकाणी उंचवट्यामुळे अपघाताचा धोका वाढला असून, याठिकाणी कोणतेही सूचना फलक लावले नसल्याने रात्री अपघातांची भीती वाढली आहे.
एकेरी वाहतुकीने रस्त्यावर वारंवार वाहतूक कोंडी होते. अर्ध्या तासाच्या अंतरासाठी एक तासाचा वेळ लागत असून, अनेकजण दूरचा का असेना खड्डे टाळण्यासाठी पर्यायी मार्ग शोधत लक्ष्मी फाटा- दुधगावमार्गे आष्ट्याला जाणे पसंत करीत आहेत. दोन्ही बाजूंनी रस्त्याची खुदाई केल्याने अपघातांची वाढली आहे. ठेकेदाराने धोक्याच्या ठिकाणी सूचना फलक लावून हा रस्ता लवकर पूर्ण करून वाहनधारकांसाठी खुला करावा, अशी मागणी होत आहे.
आष्टा ते सांगलीदरम्यान १५ जुलैपर्यंत काँक्रीटीकरण केलेली रस्त्याची बाजू वाहनधारकांसाठी खुली करण्यात येईल. रस्त्यावर काँक्रीटीकरणाचे दोन थर देण्यात येतील. या रस्त्याची आम्ही पाहणी केली असून, खड्डे बुजविणार आहोत. उंचवट्याच्या ठिकाणी फलक लावू रस्ता खचलेला आहे, अशा ठिकाणी रस्ता वाहतुकीयोग्य करणार आहोत, हा रस्ता दर्जेदार अशी माहीती महामार्गाचे शाखा अभियंता वितेज पाटील यांनी दिली.