सांगली जिल्ह्यात मतमोजणीसाठी पोलिसांचा तगडा बंदोबस्त

सांगली जिल्ह्यातील आठ विधानसभा मतदारसंघांतील मतदान पूर्ण झाल्यानंतर आता मतमोजणीकडे लक्ष लागले आहे. या पार्श्वभूमीवर पोलिस यंत्रणाही सतर्क झाली आहे. जिल्ह्यात मतमोजणीसाठी साडेचार हजार पोलिस कर्मचारी तैनात केले जाणार आहेत.याशिवाय हुल्लडबाजांवर कारवाईसाठी ड्रोन कॅमेर्‍यांचा वापर केला जाणार आहे.

आठही विधानसभा मतदारसंघांत चुरशीच्या लढती झाल्या. सांगली, खानापूर-आटपाडी व जत मतदारसंघांत तिरंगी, तर इतर पाच मतदारसंघांत दुरंगी लढती झाल्या. यंदा मतदानाचा टक्काही वाढला आहे. मतदान प्रक्रिया शांततेत पार पडल्याने पोलिस यंत्रणेने सुटकेचा नि:श्वास टाकला. आता मतमोजणीची तयारी पोलिसांनी सुरू केली आहे. मतमोजणीसाठी जिल्ह्यात साडेचार हजार कर्मचारी तैनात केले जाणार आहे. मतमोजणी केंद्रासह संवेदनशील भाग, प्रमुख चौकात पोलिसांचा तगडा बंदोबस्त ठेवला जाणार आहे.

पोलिस अधीक्षक संदीप घुगे, अप्पर अधीक्षक रितू खोखर, जिल्हा विशेष शाखेचे सुधीर भालेराव यांनी मतमोजणी बंदोबस्ताची आखणी केली आहे. निमलष्करी दलाच्या नऊ तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत. पोलिस दलाकडील तीन हजार कर्मचारी, होमगार्ड असा तगडा बंदोबस्त तैनात केला जाणार आहे.

सांगलीत तरुण भारत क्रीडांगणावर मतमोजणी होत आहे. या रस्त्यावरील वाहतुकीतही बदल केले जाणार आहेत. दरम्यान, सांगलीतील मतमोजणी बंदोबस्ताबाबत पोलिस उपअधीक्षक विमला एम. यांनी सायंकाळी पोलिस निरीक्षकांची बैठक घेत आढावा घेतला. या बैठकीला पोलिस निरीक्षक संजय मोरे, बयाजीराव कुरळे, किरण चौगले उपस्थित होते. मतमोजणीनंतर शहरात कुठेही अनुचित प्रकार घडू नये, याची खबरदारी घेण्याची सूचनाही त्यांनी केली.