विधानसभा निवडणुकीचा निकाल उद्या जाहीर होत आहे.निकालानंतर विजयी उमेदवारांची मिरवणूक काढणे, साउंड सिस्टीम लावणे, सायलेन्सर काढून वाहने फिरविणाऱ्यास मनाई केली आहे. असा प्रकार दिसल्यास तातडीने कारवाईचे आदेश पोलिस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी दिले. रमणमळा व व्ही. टी. पाटील सभागृहामध्ये मतमोजणीसाठी कडेकोट पोलिस बंदोबस्तही तैनात करण्यात आला आहे.
विधानसभेची मतमोजणी व निकाल शनिवारी जाहीर होणार आहेत. निकालानंतर कोणीही मिरवणूक काढू नये, अशा सक्त सूचना पोलिस प्रशासनाने दिल्या आहेत. साउंड सिस्टीमचा वापर करण्यावरही बंदी घातली आहे. प्रत्येक मतमोजणी केंद्राबाहेर शंभर पोलिस, ५० होमगार्डसोबतच केंद्रीय सुरक्षा पथकांचे जवानही तैनात केले जाणार आहेत. निकालानंतर कार्यकर्त्यांकडून वाहनांचे सायलेन्सर काढून वाहने भरधाव पळविण्याचे प्रकार होतात.कोल्हापूर जिल्ह्यात असे प्रकार आढळल्यास जाग्यावर अशी वाहने जप्त होणार आहेत. रस्त्यावरून जाणाऱ्या नागरिकांवर गुलालाची उधळण केल्यास संबंधितांवरही कारवाई होणार आहे.