आमदार विश्वजीत कदमांचा रोख नेमका कोणाकडे?

यंदाच्या लोकसभा निवडणुकीत सांगली मतदारसंघात विशाल पाटलांनी बाजी मारली. निवडणुकीच्या रिंगणात अपक्ष उमेदवार म्हणून उतरलेल्या विशाल पाटलांनी निवडणूक निकालानंतर भाजप, राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या नेत्या-पदाधिकाऱ्यांनी आपल्याला मदत केल्याचं म्हटलं होतं. त्यातच आता विशाल पाटलांना साथ देणाऱ्या आमदार विश्वजीत कदम यांनी देखील जिल्ह्याच्या विकासासाठी काँग्रेसच्या नेत्यांनी एकजुटीने काम केले असल्याची वाच्यता केली आहे. सांगलीत आयोजित एका कार्यक्रमात संबोधित करताना विश्वजीत कदमांनी जिल्ह्यातली राजकीय परिस्थितीबद्दल भाष्य केले आहे.

ते म्हणाले, ‘सांगलीतील्या काँग्रेसची एकत्रितपणे मूठ बांधली. आमच्यातील हेवेदावे सगळे विसरुन आम्ही एकदिलाने काम करण्याचा निर्णय घेतला. सगळी कटूता बाजूला ठेवत जिल्ह्याच्या विकासासाठी एकत्र काम करण्याची तयारी सर्व काँग्रेस नेत्यांनी दर्शवली. पण आमची झालेली ही एकजूट आणि आम्ही बांधलेली मूठ काही जणांना बघवली नाही. तसेच काँग्रेस नेत्यांची, कार्यकर्त्यांची एकजूट होत असताना ज्यांनी खडे टाकण्याचे प्रयत्न केले, त्यांना लोकसभेत त्यांची जागा दाखवून दिली आहे.’ आमदार विश्वजीत कदमांचा रोख नेमका कोणाकडे? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

दरम्यान लोकसभेच्या रणधुमाळीनंतर राज्यातील सर्वपक्षीय नेत्यांनी विधानसभेची तयारी सुरु केलेली पाहायला मिळते. यातच आमदार विश्वजीत कदमांनी देखील सांगली विधानसभेबाबत कार्यकर्त्यांना आश्वासित केले आहे. कदम म्हणाले, सर्व काँग्रेस कार्यकर्त्यांना माझे वचन आहे की, ज्यांनी ज्यांनी काँग्रेसद्वारे काम केले त्यांना चांगला न्याय देऊ. आता एक माणूस विशाल पाटील यांच्या रूपात लोकसभेत पाठवलाय, उद्या सांगली शहरातून दोन आमदार देखील विधानसभेत पाठवू. तसेच २२ तारखेला सांगली जिल्ह्याची नियोजन कमिटीची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात आहे. विशाल पाटील यांची ही सांगलीतील पहिली बैठक असेल आणि विरोधकांची शेवटची बैठक असेल, असे देखील कदम यांनी सूचित केले आहे.