राज्यातील बहुतांश जिल्हा परिषद शाळांमध्ये विजेचा प्रश्न कायम आहे. औद्योगिक पद्धतीने भरमसाट होणारी वीज आकारणी आणि वीजबिल भरण्याची कोणतीही नसणारी आर्थिक तरतूद यामुळे शाळांमधील वीजजोडणी खंडित केलेल्या आहेत.
या पार्श्वभूमीवर वरवडे (ता. माढा) केंद्रातील सर्व म्हणजे १७ जिल्हा परिषदांच्या शाळा आणि दोन माध्यमिक विद्यालयांना मुंबई येथील एक्सिम बँकेने एक किलोवॉट क्षमतेचे सौरऊर्जा पॅनेल बसवले आहेत. याकरिता बँकेने त्यांच्या सीएसआर फंडातून सर्व रक्कम खर्च केली आहे.
सध्या राज्यभरातील जिल्हा परिषदांच्या शाळांमधील वीजबिलाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. परिणामी बिले थकीत जाऊन वीज वितरण कंपनीने अनेक शाळांचा वीजपुरवठा खंडित केला आहे. परिणामी, विजेअभावी शाळांमधील संगणक, एलसीडी प्रोजेक्टर यांसारखी डिजिटल साधने वापराविना धूळखात पडलेली असतात.मात्र याच समस्येवर उपाय म्हणून माढा तालुक्यातील वरवडे केंद्रासाठी एक्सिम बँक धावून आली. ग्लोबल टीचर रणजित डिसले यांच्या मार्गदर्शनाखाली बँकेने केंद्रातील सर्व १७ जिल्हा परिषद शाळा व दोन माध्यमिक विद्यालयांमध्ये सौरऊर्जा पॅनेल बसवले आहेत. त्यातून मागील वर्षभरात सर्व शाळांमध्ये एकूण ३० हजार युनिट विजेची निर्मिती झाली आहे. शिवाय सौरऊर्जा निर्मिती करणारी राज्यातील पहिले केंद्र म्हणून वरवडे केंद्राची ओळख निर्माण झाली आहे.
सौरऊर्जा पॅनेलबरोबरच एक्सिम बँकेने त्यांच्या सीएसआर फंडातून वरवडे, परितेवाडी, आहेरगाव, वेणेगाव, अकुंभे आणि अकोले बुद्रूक या गावांतील जिल्हा परिषद शाळांमध्ये सक्षम प्रकल्प सुरू केला आहे. याअंतर्गत विद्यार्थ्यांना टॅबच्या मदतीने शिक्षण देणारी मोबाईल व्हॅन आणि चार प्रशिक्षित स्वयंसेवक नियुक्त केले आहेत.