खानापुरातील वंचित गावांचा डोंगरी क्षेत्रात समावेश करावा…..

खानापूर मतदारसंघातील वंचित गावांचा डोंगरी क्षेत्रात समावेश करण्यात यावा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष वैभव पाटील यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे केली आहे.उपमुख्यमंत्री पवार यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, महाराष्ट्र शासन नियोजन विभागाच्या ता. १३ मार्च २०२४ च्या शासन निर्णयानुसार डोंगरी विभाग विकास कार्यक्रम अंतर्गत सुधारित निकषानुसार खानापूर मतदारसंघातील काही गावांचा समावेश करण्यात आला आहे. परंतु खानापूर घाटमाथ्यावरील सर्वच गावे ही डोंगराळ भागातच विखुरलेली आहेत.

त्यामुळे सर्वच गावांचा समावेश होण्याबाबत शासनाकडे वैभव पाटील यांचे अजित पवारांना निवेदन केले आहे.त्यामध्ये बेणापूर, बलवडी, जाधववाडी, मेंगाणवाडी, रेवणगाव, घोटीखुर्द, हिवरे, पळशी, बानुरगड, ताडाचीवाडी, भडकेवाडी, धोंडेवाडी या गावांनाच शासन स्तरावर घोषित केले असले तरी या गावांच्याच आजूबाजूला असणाऱ्या गावांवर शासनाने का अन्याय केला आहे ?असा सवाल वैभव पाटील यांनी केला आहे. वैभव पाटील यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेऊन सदर बाब निदर्शनास आणून दिली आहे.

खानापूर तालुक्यातील गोरेवाडी, सुलतानगादे रामनगर, जखिनवाडी, करंजे, पोसेवाडी, ऐनवाडी व आटपाडी तालुक्यातील खरसुंडी परिसरातील अन्य वंचित गावे सहित या गावांचा समावेश नाही. सदर गावे सुद्धा डोंगरी भागातच आहेत. त्यामुळे शासनाने या गावांचा सुद्धा समावेश केला पाहिजे, असा आग्रह अजित पवार यांच्याकडे केला आहे. यावेळी खानापूर मतदारसंघातील डोंगरी क्षेत्रातील वंचित गावांना योग्य न्याय मिळेल, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री पवार यांनी दिल्याची माहिती वैभव पाटील यांनी दिली आहे