इस्लामपुरात नेत्यांच्या पैजेचा विडा!

इस्लामपूर हातकणंगले लोकसभा मतदारसंघात शिवसेनेचे विजयी उमेदवार धैर्यशील माने आणि उबाठाचे उमेदवार सत्यजीत पाटील यांच्यात काट्याची लढत झाली. यामध्ये विजयी कोण होणार, यावर शरदचंद्र पवार राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष शहाजी पाटील आणि भाजपचे ज्येष्ठ नेते विक्रम पाटील यांच्यात पैज लागली होती. अंतिम मतमोजणीच्या टप्प्यात धैर्यशील माने विजयी झाल्याने शहाजी पाटील यांना पैजेत हरावे लागले, याची चर्चा चांगलीच रंगली आहे.

हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील इस्लामपूर मतदारसंघ शरदचंद्र पवार राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचा बालेकिल्ला मानला जातो. त्यामुळेच कोणत्याही परिस्थितीत उबाठाचे उमेदवार सत्यजीत पाटील निवडून येणारच, असा ठाम विश्वास राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे शहराध्यक्ष शहाजी पाटील यांनी व्यक्त केला होता.यावर भाजपचे ज्येष्ठ माजी नगरसेवक विक्रम पाटील यांनी शिवसेनेचे उमेदवार धैर्यशील माने हेच विजयी होतील, असा आत्मविश्वास व्यक्त केला होता. अत्यंच चुरशीच्या ठरलेल्या या निवडणुकीच्या निकालाबाबत या दोघा नेत्यांची पैज लागली होती.

उभय नेत्यांच्या या अनोख्या पैजेची सध्या शहरात जोरदार चर्चा आहे.शिंदेसेनेचे उमेदवार धैर्यशील माने निवडून आले तर शहाजी पाटील यांनी विजयी उमेदवार धैर्यशील माने यांचा सन्मानाने वाजत-गाजत सत्कार करून भोजन द्यावे, असा प्रस्ताव विक्रमराष्ट्रवादी शरदचंद्र पवार पाटील यांनी मांडला. त्याच जोमाने शहाजी पाटील यांनीही या पैजेला होकार दिला. मत मोजणीच्या दिवशी धैर्यशील माने आणि सत्यजीत पाटील यांच्यातील मतांच्या आकडेवारीत काट्याची लढत दिसून आली. अंतिम टप्प्यात मात्र शिवसेनेचे धैर्यशील माने विजयी झाले. यामध्ये विक्रम पाटील जिंकले आणि शहाजी पाटील हरले. निकालानंतर या अनोख्या पैजेचा विडा राजकीय वर्तुळात चांगलाच रंगला आहे.