इस्लामपुर शहरात मृत्यूचा सापळा बनलेल्या रस्त्यावर गतिरोधक लावा नागरिकांची मागणी

इस्लामपूर शहराच्या शिवनगर परिसरातील जावडेकर चौक ते तिरंगा चौक हा रस्ता मृत्यूचा सापळा बनत चालला आहे. गेल्या काही दिवसात या रस्त्यावर दोन युवकांचा हकनाक बळी गेला आहे. तसेच इतर अपघातही सातत्याने होत आहेत.

त्यामुळे या रस्त्यावर ठिकठिकाणी गतिरोधक बसवावेत अशी मागणी करण्यात आली आहे.याबाबतचे निवेदन कोळीमळा, हवालदार कॉलनी, तिरंगा चौकातील नागरिकांनी नगरपालिकेचे प्रशासक राहुल मर्ढेकर यांना दिले आहे. कोळीमळा ते तिरंगा चौक हा रस्ता चांगल्या पद्धतीच्या डांबरीकरणाने झाला आहे.

मात्र हा रस्ता आता सुसाट पद्धतीने वाहने चालवली जात असल्याने अपघातांना निमंत्रण देत निष्पापांचे बळी घेणारा ठरत आहे. निशांत पाटोळे व प्रशांत खांडके हे दोन युवक त्यांची कोणतीही चूक नसताना समोरून भरधाव वेगात आलेल्या वाहनाची धडक बसून ठार झाले आहेत. त्यामुळे परिसरातून संतापाची लाट उसळली आहे.यापूर्वीही पालिकेला इसहाक हवालदार यांनी निवेदन देऊन गतिरोधक बसविण्याची मागणी केली होती.

मात्र पालिकेने हा विषय गांभीर्याने घेतला नाही. त्याचाच परिणाम म्हणून दोन युवकांना आपला जीव गमवावा लागला. पालिकेने तातडीने गतिरोधकाची मागणी मान्य न केल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.

यावेळी युवक राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष सचिन कोळी, सुरज जाधव, फजल हवालदार, सचिन कांबळे, गौरव थोरात, अन्सार हवालदार, युवराज वाडकर, सैफ हवालदार, धनंजय जाधव, समीर शेख, सतीश थोरावडे, सौरभ सूर्यवंशी उपस्थित होते.