लोकसभा निवडणुकीनंतर आता विधानसभेचे वेध लागले आहे. गावोगावी अनेक मतदारसंघातील नेत्यांच्या जोरदार हालचाली देखील सुरु झाल्या आहेत. हातकणंगले लोकसभा निवडणुकीत इस्लामपूर मतदारसंघात राष्ट्रवादीच्या शरदचंद्र पवार गटाच्या मतांचा टक्का घसरला आहे. त्यामुळे इस्लामपूरची जागा जिंकण्याचा आत्मविश्वास कार्यकर्त्यांना आला आहे. आगामी विधानसभेला विरोधकांनी एकत्रित यावे असे आवाहन शिंदेसेनेचे जिल्हा नियोजन न समिती सदस्य भीमराव माने यांनी केले.
लोकसभा निवडणुकीत डिग्रज मंडलामधील सावळवाडी, माळवाडी, दुधगाव, कवठेपिरान, तुंग, कसबेडिग्रज, मौजेडिग्रज, समडोळी अशी गावे येतात. काही गावांत संमिश्र सत्ता आहे, तर काही गावांत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचे नेतृत्व आहे. डिग्रज मंडलामध्ये उद्धवसेनेचे उमेदवार तिसऱ्या क्रमांकावर गेले. या भागातील काही गावांत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी यांना मानणारा वर्ग आहे. त्यामुळेच आगामी विधानसभेला डिग्रज मंडलामधील आठ गावांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे, असे माने यांनी सांगितले.