इचलकरंजीतील जलवाहिनी गळतीचे काम दर्जेदार करण्याच्या सूचना

इचलकरंजीचा पाणीप्रश्न मुद्दा सर्वत्रच जगजाहीर आहे. पाण्यासाठी शहरवासियांचे खूपच हाल होतात. अशातच इचलकरंजी शहरात पाणीपुरवठा करणाऱ्या जलवाहिनीला सतत गळती लागत असल्याकारणाने पाण्याचे वेळापत्रक कोलमंडते.मजरेवाडी (ता. शिरोळ) येथून येणाऱ्या जुन्या जलवाहिनीस शिरढोण गावातील बाणदार हायस्कूलसमोर गळती लागली आहे. ही गळती काढण्याचे काम महापालिकेच्यावतीने सुरू करण्यात आले आहे.

जलवाहिनीची गळती काढणे आणि ड्रेनेज दुरुस्तीच्या कामाची पाहणी करून काम दर्जेदार आणि गुणवत्तापूर्ण करण्याच्या सूचना आयुक्त ओमप्रकाश दिवटे यांनी पाणीपुरवठा विभागाला दिल्या. अभियंता बाजी कांबळे आणि अभय शिरोलीकर यांना तातडीने काम पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या.


आमराई रोड येथे काळ्या ओढ्याची आणि सांगली रोड येथे सुरू असलेल्या ड्रेनेज दुरुस्तीच्या कामाच्या ठिकाणाची पाहणी केली. तर बांधकाम विभागाच्यावतीने गुरुकुल कॉलनी, पी. बा. पाटील मळा, अण्णा रामगोंडा शाळा, बालाजी कॉलनी, सुंदर बाग, आदी परिसरात रस्ते व गटारींचे काम सुरू आहे. अभियंता महेंद्र क्षीरसागर यांच्यासोबत त्यांनी या भागांना भेटी दिल्या.