मद्यप्रेमींसाठी महत्त्वाची बातमी! ही गोष्ट असेल तरच मिळणार बारमध्ये दारू…..

पुणे, मुंबईतल्या मद्यप्रेमींसाठी महत्त्वाची बातमी आहे. बारमध्ये दारू पिण्याच्या नियमावलींमध्ये बदल करण्यात आला आहे. काही दिवसांपूर्वी पुण्यामध्ये एक भीषण अपघात घडला होता.भरधाव पोर्शे कारनं दुचाकीस्वार तरुण आणि तरुणीला चिरडलं. या घटनेत अभियंता असलेल्या या तरुण तरुणीचा मृत्यू झाला. ही कार एक अल्पवयीन मुलगा चालवत होता. विशेष म्हणजे तो मद्यधुंद अवस्थेत असल्याचं समोर आलं. या अपघातानंतर प्रशासनाला खरबडून जाग आली.

त्यानंतर अवैध पद्धतीनं मद्य विक्री करणाऱ्या अनेक बारवर कारवाईचा बडगा उगारला गेला. दरम्यान आता पब आणि बार मालकांनीच या प्रकरणात पुढाकार घेत नवा नियम बनवला आहे.नव्या नियमानुसार जर तुमच्याकडे वयाचा अधिकृत पुरावा असेल तरच तुम्हाला आता पुणे आणि मुंबईतील बार व पबमध्ये दारू मिळणार आहे. वयाचा सरकारी पुरावा यासाठी ग्राह्य धरला जाणार आहे. तुम्ही वयाचा पुरावा दाखवल्यानंतरच तुम्हाला बारमध्ये एन्ट्री मिळणार आहे.

अल्पवयीन मुलांना दारूची विक्री केली जाऊ नये यासाठी आता बार मालकांकडून हा नियम बनवण्यात आला आहे. बारच्या दरवाजावरच वयाच्या पुराव्याची तपासणी करण्यात येणार आहे. वाईन आणि बियर पिण्यासाठी 21 वर्ष तर दारू पिण्यासाठी 25 वर्षांची अट आहे.