कोल्हापूर जिल्ह्यात पावसाची हजेरी…..

आठवड्याभराच्या विश्रांतीनंतर कोल्हापूर जिल्ह्यात रविवारी दमदार पाऊस झाला. पश्चिम घाटात जोरदार पाऊस झाला. सायंकाळी इचलकरंजी, कागल परिसरातही पावसाने हजेरी लावली. पावसामुळे तापलेला पारा कमी झाल्याने दिलासा मिळाला.यावर्षी पावसाची सुरुवात चांगली झाली.

मात्र जवळपास आठवडाभर पावसाने दडी मारली होती. यामुळे शेतकरी चिंतेत होता. दुसरीकडे पुन्हा उकाडा वाढल्याने नागरिक त्रस्त झाले होते.काल जिल्ह्याच्या बऱ्याच भागात पावसाने हजेरी लावली. पश्चिम भागात दमदार पाऊस झाला.

इचलकरंजीसह हातकणंगले तालुक्यात अनेक ठिकाणी तासभर पावसाने झोडपून काढले. त्यामुळे परिसर जलमय झाला. पावसाने उघडीप दिल्यानंतर रस्त्यावर गर्दी दिसू लागली. शाळा सुरू झाल्या असल्याने शालेय साहित्य घेण्यासाठी बाजारात गर्दी दिसू लागली. या पावसामुळे शेती कामालाही गती आली आहे. पावसाने सलग बरसत राहावे अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.