5000 पेक्षा जास्त धावा… 350+ विकेट्स ! ‘या’ क्रिकेटरवर लागली 5 वर्षांची बंदी

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेनं मोठी कारवाई केली आहे. आयसीसीने श्रीलंकेच्या माजी घरगुती क्रिकेटपटू सलिया समन याच्यावर मोठी कारवाई करत सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून पाच वर्षांसाठी बंदी घातली आहे. 2021 मध्ये अबू धाबी टी-10 लीगदरम्यान मॅच फिक्स करण्याचा प्रयत्न केल्याच्या आरोपांमध्ये तो दोषी आढळला होता.

39 वर्षीय समनवर मॅच फिक्स करण्याची योजना आखल्याचा आणि इतर खेळाडूंना यात ओढण्याचा आरोप सिद्ध झाला. त्याने खेळाडूंना आर्थिक ऑफर देण्याचाही प्रयत्न केला. मात्र, आयसीसी आणि एंटी-करप्शन अधिकाऱ्यांच्या वेळीच झालेल्या हस्तक्षेपामुळे ही योजना अपयशी ठरली.

आयसीसीच्या एंटी-करप्शन त्रिब्युनलनं एमिरेट्स क्रिकेट बोर्ड च्या भ्रष्टाचारविरोधी संहितेचं उल्लंघन केल्याबद्दल समनला दोषी ठरवलं. त्याच्यावर सप्टेंबर 2023 मध्ये तात्पुरती निलंबनाची कारवाई झाली होती, त्यामुळे 5 वर्षांच्या बंदीपैकी दोन वर्षांची शिक्षा तो आधीच भोगून झाले आहे. त्याच्यावर आर्टिकल 2.1.1 (मॅच फिक्सिंगचा प्रयत्न), 2.1.3 (लाच देण्याचा प्रयत्न) आणि 2.1.4 (इतरांना भ्रष्ट वर्तनासाठी प्रवृत्त करणे) या कलमांखाली दोष सिद्ध झाला.

सलिया समनचं घरगुती क्रिकेट करिअर उल्लेखनीय होतं. त्याने 101 फर्स्ट-क्लास सामन्यांत 3,662 धावा आणि 231विकेट्स घेतल्या. यात 22 अर्धशतकं आणि 2 शतकांचा समावेश आहे. लिस्ट ए क्रिकेटमध्ये त्यांच्याकडे 898 धावा आणि 84 विकेट्स आहेत, तर टी20 फॉरमॅटमध्ये त्यांनी 673 धावा आणि 58 विकेट्स मिळवल्या.