पोलिस असल्याचे भासवून व दमदाटी करून दीड तोळ्याची अंगठी लंपास!

माळशिरस तालुक्यातील पिलीव येथे एका सेवानिवृत्त शिक्षकाला पोलिस असल्याचे भासवून व दमदाटी करून दीड तोळ्याची सोन्याची अंगठी लंपास केल्याची घटना घडली.

सेवानिवृत्त शिक्षक कृष्णा विठोबा देशमुख (वय ७४) यांना पोलिस अधिकारी असल्याचे भासवून, दुचाकीवरून आलेल्या एकाने, मी अधिकारी असून, आपल्या गावात व भागात दारूचे, चोऱ्याचे व गांजाचे अवैध धंदे जोरात चालतात म्हणून धमकावले.तसेच तुम्हाला पोलिसात घेऊन जाऊन गुन्हा दाखल करून अटक करू, अशी भीती दाखवून व सज्जड दम भरून पाच हजार रुपयांची मागणी केली.

तुमच्या जवळ असलेले खिशातील साहित्य बाहेर काढून दाखवा, नाहीतर तुमच्या हातातील सोन्याची अंगठी मला द्या, असे धमकावल्याने व त्या तोतया अधिकाऱ्याने त्याच्यासोबत एक डमी तोतया आरोपी आणून त्याला त्यांच्यासमोर दम भरून, दोन थोबाडीत मारून दहशत निर्माण केल्यामुळे कृष्णा देशमुख या ज्येष्ठ नागरिकाने गडबडून जाऊन भीतिपोटी आपल्या खिशातील साहित्य व हातातील १५ ग्रॅमची सोन्याची अंगठी (किंमत अंदाजे एक लाख दहा हजार) काढून दिली.

अंगठी घेऊन तोतया पोलिस दुचाकीवरून फरार झाला.ही घटना पिलीव पेठेत सायंकाळी साडेसातच्या सुमारास घडली. घटनेची फिर्याद पिलीव पोलिस दूरक्षेत्रात दिली आहे. पोलिस निरीक्षक नारायण पवार यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणे हवालदार धनाजी झगडे तपास करीत आहेत.