इचलकरंजी महापालिकेमध्ये दोन दिवसापूर्वी आयुक्त पदाच्या खुर्चीत दोन अधिकारी एकाच वेळी बसले होते. ओमप्रकाश दिवटे व पल्लवी पाटील या अधिकाऱ्यांनी आयुक्त पदावर आपलीच नियुक्ती असल्याचा दावा केला होता. अखेर या भागामध्ये दिवटे यांची सरशी झाली. मात्र, या वादामागे राजकीय शक्ती कार्यरत असल्याचे चर्चा सुरू होती. स्थानिक नेत्यांनी तसे भाष्य केले होते.
याबाबत विचारणा केली असता आमदार प्रकाश आवाडे यांनी मात्र कानावर हात ठेवले. ही घटना होत असताना मी मुंबईत होतो. मला काहीच माहित नाही, असे ते म्हणाले.
राजकीय हस्तक्षेपामुळे महापालिका आयुक्त बदलीचा खेळखंडोबा होत असल्याचा आरोप विरोधकांनी केला होता. त्याला उत्तर देताना आवाडे यांनी मौन पाळले. दोन-दोन आयुक्त नियुक्तीनंतर खुर्चीचा खेळ रंगला होता. त्यावेळी आपण गावांत नव्हतो.
मात्र दोघांना एकाच वेळी आयुक्तांच्या खुर्चीवर बसल्याचे पाहून मजा आली असे सांगत असा प्रकार केवळ इचलकरंजीतच घडू शकतो अशी मिश्कील टिपणीही केली. या घडामोडीचा कोणताही शहरातील विकास कामांवर परिणाम होणार नसल्याचेही त्यांनी स्पष्टीकरण दिले.
