आष्टा येथे वक्तृत्व, चित्रकला, निबंध स्पर्धेचे आयोजन

माजी ग्रामविकास व पाणीपुरवठा मंत्री डॉ. अण्णासाहेब डांगे यांच्या वाढदिवसानिमित्त आष्टा येथे राज्यस्तरीय शालेय व महाविद्यालयीन वक्तृत्व, चित्रकला व निबंध स्पर्धांचे आयोजन केल्याची माहिती संत ज्ञानेश्वर शिक्षण संस्थेचे सचिव ॲड.राजेंद्र डांगे यांनी दिली. २ जुलैला चित्रकला स्पर्धा होईल. पाचवी ते सातवीच्या विद्यार्थ्यांसाठी महाराष्ट्रातील आतापासून व पूर्वीच्या मुख्यमंत्र्यांचे व पंतप्रधान नरेंद्र मोदींचे चित्र काढायचे आहे. ३ जुलैला नववी ते बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी चित्रकला स्पर्धा आहे. शाळेच्या मैदानावर खेळल्या जाणाऱ्या खेळाचे चित्र असेल.

४ जुलैला वक्तृत्व स्पर्धा असून पाचवी ते आठवी विद्यार्थ्यांसाठी आठवी उत्तीर्ण झाल्यावर पुढील शिक्षण घेत असताना विद्यार्थी व विद्यार्थिनींचा शाळेत येताना पोशाख कसा असावा? हा विषय आहे. ५ जुलैला नववी ते बारावी विद्यार्थ्यांसाठी शालेय विद्यार्थी मुले-मुलींचा गणवेश कसा असावा? वक्तृत्व स्पर्धा होईल. ६ जुलैला पदवी व पदव्युत्तर विद्यार्थ्यांसाठी नवीन शैक्षणिक धोरणात मिलिटरी शिक्षणाचा नवा अभ्यासक्रम चालू करण्याची आवश्यकता आहे का? या विषयावर वक्तृत्व स्पर्धा होईल.

८ जुलैला पाचवी ते आठवीच्या विद्यार्थ्यांना तुम्हास आवडणारे व्यक्तिमत्त्व हा निबंध स्पर्धेचा विषय आहे. ९ जुलैला बलशाली भारत होण्यासाठी शासनाने काय करावे? या विषयावर निबंध स्पर्धा होईल. १० जुलैला पदवी व पदव्युत्तर विद्यार्थ्यांसाठी बलशाली भारत निर्माण होण्यास तुमचा सहभाग कसा असेल, हा विषय आहे. स्पर्धेसाठी रोख रकमेची बक्षिसे आहेत. सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.