विटा, करंजेत चार नवीन मोर्चरी कॅबिनेटला मंजूरी!

सध्या विटा व करंजे ग्रामीण रुग्णालयात प्रत्येकी दोन मोर्चरी कॅबिनेट यापूर्वी कार्यान्वित होते. मात्र, त्यांची संख्या कमी असल्याने नातेवाईकांची गैरसोय होत होती. त्यामुळे या दोन्ही ठिकाणी असलेल्या ग्रामीण रुग्णालयांत प्रत्येक चार नवीन मोर्चरी ( शवगृह) कॅबिनेट मिळावीत, अशी मागणी तत्कालीन नगराध्यक्षा तथा जिल्हा नियोजन समितीच्या माजी सदस्य प्रतिभा पाटील यांनी सभेत केली होती. या मागणीचा पाठपुरावा राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष वैभव पाटील यांनी आरोग्य विभागाकडे केला होता. या पाठपुराव्याला अखेर यश मिळाले असून, विटा व करंजे येथे नवीन चार मोर्चरी कॅबिनेट मंजूर झाल्याने येथील मोर्चरींची संख्या सहा झाली आहे.

जिल्हा नियोजन समितीच्या तत्कालीन सदस्य प्रतिभा पाटील यांनी त्यांच्या कार्यकाळात विटा व करंजे येथील ग्रामीण रुग्णालयात प्रत्येकी चार नवीन वाढीव मोर्चरी ( शवगृह ) कॅबिनेटची केलेली मागणी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. विक्रमसिंह कदम यांनी तातडीने मान्य केली. त्यामुळे विटा व करंजे येथे नवीन मोर्चरी ( शवगृह) कॅबिनेट तत्काळ बसविणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष वैभव पाटील यांनी दिली.

मात्र, करंजे ग्रामीण रुग्णालयातील पूर्वीचे दोन जुने मोर्चरी खराब झाल्याने ते बाजूला ठेवले आहेत. त्यामुळे करंजेत चारच मोर्चरी कॅबिनेट कार्यान्वित राहणार आहेत. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. विक्रमसिंह कदम यांनी हे नवीन मोर्चरी कॅबिनेट तातडीने कार्यान्वित करण्याच्या सूचना आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. शवगृहाची मागणी पुर्ण झाल्याने आता मोठी समस्या सुटण्यास मदत होणार आहे.