इचलकरंजी शहरासाठी मंजूर सुळकूड पाणीपुरवठा योजनेच्या अंमलबजावणीच्या अनुषंगाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवार, 1 मार्च रोजी मुंबईत मुख्यमंत्री समिती कक्षामध्ये बैठक आयोजित केली आहे.याबाबत अवर सचिव नीलेश पोतदार यांनी कळवले आहे. बैठकीत ठोस तोडगा निघणार का, याकडे इचलकरंजीसह दूधगंगा काठच्या ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे.
इचलकरंजी शहरवासीयांना स्वच्छ व भविष्यातील तरतूद म्हणून अमृत 2.0 अभियानांतर्गत 162 कोटींची सुळकूड उद्भव दूधगंगा योजना शासनाने मंजूर केली आहे. या योजनेला कागल व शिरोळ तालुक्यातील दूधगंगा काठावरील ग्रामस्थांसह आजी-माजी लोकप्रतिनिधींनी विरोध दर्शवला आहे. इचलकरंजी शहरवासीयांच्या वतीने योजना कार्यान्वित व्हावी, अशी आग्रही मागणी विविध आंदोलनांद्वारे करण्यात येत आहे. या अनुषंगाने तत्कालीन जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्याकडे बैठक झाली होती. रेखावार यांनी राज्य शासनाला अहवाल पाठवला होता, तर सुळकूड योजना कार्यान्वित होण्यासाठी कृती समितीने इचलकरंजी बंदसह प्रांत कार्यालयावर विराट मोर्चा काढण्याचा निर्धार केला होता; मात्र खा. धैर्यशील माने, आ. प्रकाश आवाडे यांनी समन्वयाने मार्ग काढण्याच्या अनुषंगाने 11 सप्टेंबर 2023 रोजी मुंबईत बैठक आयोजित केली होती; मात्र ही बैठक स्थगित झाली होती.