पंचगंगा नदीत केमिकल मिश्रीत पाणी! नागरिकांचा जीव धोक्यात….

पंचगंगा नदीत मागच्या काही दिवसांपूर्वी पंचगंगा नदीत केमिकल मिश्रीत पाणी सोडल्याने लाखो मासे मृत्यूमुखी पडल्याची घटना ताजी असतानाच आता पुन्हा नदीला फेसाळलेले पाणी आल्याने नदी पूर्ण प्रदुषीत झाली आहे.दरम्यान मागच्या दोन दिवसात झालेल्या पावसाने लाल आणि गढुळ पाण्याबरोबर आता फेसाळलेलं पाणी आल्याने नागरिकांनी पाणी कुठलं प्यायचं हा प्रश्न निर्माण झाला आहे. शिरोळ तालुक्यातील तेरवाड बंधाऱ्यातून मोठ्या प्रमाणात पाणी फेसाळत बाहेर पडत असून, पाण्याला उग्र वास सुटला आहे.

नदी प्रदूषित करणाऱ्या घटकांवर प्रदुषण नियंत्रण मंडळाने तत्काळ कारवाई करावी, अशी मागणी शेतकरी व नागरिकांतून होत आहे. दोन दिवसांपासून मॉन्सूनपूर्व पावसाने जोरदार सलामी दिली. त्यामुळे पंचगंगा नदीपात्रात नवे पाणी आले असून त्या पार्श्वभूमीवर प्रदूषित घटकांनी डाव साधत रसायनमिश्रित सांडपाणी नदीपात्रात सोडले असण्याची शक्यता व्यक्त होत आहे.कोल्हापूरपासून ते तेरवाड बंधाऱ्यापर्यंत अनेक गावचे सांडपाणी, इचलकरंजी व कोल्हापूर महापालिकांचे सांडपाणी, विविध औद्योगिक वसाहतीचे रासायनिक पाणी पंचगंगा नदीत सोडले जात असल्यानेच पंचगंगेची गटारगंगा होत असल्याचा आरोप पंचगंगा नदी बचाव संघटना व पर्यावरणवादी कार्यकर्त्यांकडून केला जातो.

पंचगंगा नदीचे तेरवाड बंधाऱ्यातून वाहत असलेले नदीचे पाणी फेसाळयुक्त पांढरे झाले आहे. बंधाऱ्याच्या अलीकडचे इचलकरंजीपर्यंतचे पात्र जलपर्णीने नदीपात्र व्यापले आहे. बंधाऱ्याच्या पुढे कुरुंदवाडच्या दिशेने जलपर्णीच्या आडून प्रदूषित घटकांनी आपले रासायनिक पाणी सोडलेले स्पष्ट होते आहे. हे रसायनमिश्रित सांडपाणी फेसाळत आहे. त्यामुळे नदी फेसाने झाकली गेली आहे.

सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने नदीला पाणी वाढणार असल्याने प्रदूषित घटकांनी आपले रासायनिक पाणी मोठ्या प्रमाणात विना प्रक्रियाच थेट नदीत सोडल्याचा आरोप शेतकरी आणि नागरिकांतून होत आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील मुख्य नदी असलेल्या पंचगंगा नदी वारंवार दुषीत होत असल्याने नागरिकांच्या आरोग्याच्या प्रश्न ऐरणीवर आला आहे. प्रदुषण नियंत्रण मंडळाने याबाबत गांभीयनि विचार करून प्रदू‌षित घटकांवर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.