मैदान कुस्तीचं पण तयारी विधानसभेची! मंगळवेढ्यात होणार ‘मनसे केसरी कुस्ती’ स्पर्धा

सर्वच राजकीय पक्षांनी विधानसभेची तयारी सुरू केली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून देखील चर्चा दौरे सुरु झाले आहेत. मनसेचे पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघाचे उमेदवार व मनसे नेते दिलीप धोत्रे यांनी रविवारी (22 सप्टेंबर) मनसे केसरी कुस्ती स्पर्धेचं आयोजन केलं आहे.यासाठी थेट मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे सुपु्त्र अमित ठाकरे मंगळवेढ्यात उपस्थित राहणार आहेत. मनसेकडून निवडणुकीच्या तोंडावर या स्पर्धेचे आयोजन केले आहे.

हा आखाडा दुपारी तीन वाजता मंगळवेढा येथील इंग्लिश स्कूलच्या मैदानावर रंगणार असल्याची माहिती मनसे नेते दिलीप धोत्रे यांनी दिली.या स्पर्धेसाठी महाराष्ट्र केसरी समाधान घोडके, आखाडा प्रमुख मारुती वाकडे, मंगळवेढा कुस्तीगीर संघटनेचे अध्यक्ष दामोदर घुले, मनसेतालुकाध्यक्ष नारायण गोवे, जिल्हा उपप्रमुख चंद्रकांत पवार, मुरलीधर सरकळे आदी मान्यवर उपस्थित होते.

ग्रामीण भागातील कुस्तीपटूंना आपल्या हक्काचे मैदान मिळावे यासाठी य स्पर्धेचे आयोजन केल्याचे धोत्रे यांनी सांगितले. मनसे केसरी 2024 मध्ये 5 लाख रुपये बक्षीसासाठी दोन कुस्त्या होणार असून या महाराष्ट्र केसरी महेंद्र गायकवाड व छत्रसाल स्टेडियम दिल्लीचे आशिष हुड्डा यांच्यात लढत होणार आहे. तसेच महाराष्ट्र केसरी सिकंदर शेख व दिल्लीचा पैलवान दीपक कुमार यांच्यातही लढत रंगणार आहे.

दोन लाख रुपये बक्षीसासाठी माऊली जमदाडे व रोहित दलाल, एक लाख रुपये बक्षीसासाठी उमेश चव्हाण व संग्राम साळुंखे, तात्या जुमाळे व विजय शिंदे, पंच्याहत्तर हजार रुपये बक्षीसासाठी ज्योतिबा आटकळे व संग्राम अस्वले, तर पन्नास हजार रुपये बक्षीसासाठी सौरभ घोडके व सुनील हिप्परकर यांच्यात कुस्त्या होणार आहेत. याशिवाय स्थानिक व परिसरातील मल्लांच्या कुस्त्या सकाळी होणार आहेत .