आगामी विधानसभा निवडणुकीसाठी इच्छुकांनी मतदारसंघांमध्ये जोरदार तयारी सुरू केलेली आहे.उमेदवारी याद्या प्रसिद्ध होत आहे. तर अजूनही काही उमेदवारी याद्या प्रसिद्ध होणार आहेत. विधानसभा निवडणुकीचे उमेदवारी अर्ज भरण्यास कालपासून सुरुवात झालेली आहे. तर अनेक इच्छुक उमेदवारांनी गुरुवारचा गुरुपुष्यामृत योगाचा मुहूर्त अर्ज भरण्यासाठी काढलेला आहे. 24 ऑक्टोबरला म्हणजेच गुरुवारी खानापूर विधानसभा मतदारसंघातील उमेदवारी अर्ज दाखल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षांसह अन्य इच्छुक उमेदवार मोठ्या प्रमाणावर शक्ती प्रदर्शन करणार आहेत.
खानापूर विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी महायुतीतून शिवसेनेचे सुहास भैया बाबर यांची उमेदवारी निश्चित झाली. मात्र राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने येथील उमेदवारी अद्यापही जाहीर झालेली नाही. मुळात महाविकास आघाडीच्या जागा वाटपात खानापूर मतदारसंघ मिळवण्यासाठी उद्धवसेनेसह राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते व कार्यकर्ते आग्रही आहेत. परंतु या मतदारसंघात अद्यापपर्यंत उमेदवारी जाहीर झालेली नाही.
माजी आमदार सदाशिवराव पाटील, राजेंद्रअण्णा देशमुख की ॲड. वैभव पाटील यापैकी कोणाला उमेदवारी द्यायची याचा फैसला अद्याप झालेला नाही. तर जिल्हा परिषदेचे माजी सभापती ब्रह्मानंद पडळकर हे बंडखोरी करणार की नाही हे अद्याप स्पष्ट नाही. खानापूर मतदारसंघात उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या पहिल्या दिवशी एकही अर्ज दाखल झालेला नाही. गुरुवारी गुरुपुष्यामृतचा मुहूर्त चांगला असल्याने या दिवशी मोठ्या प्रमाणावर उमेदवारी अर्ज दाखल होण्याचे संकेत आहेत.