विठ्ठल-रुक्मिणी मातेच्या दर्शनासाठी दररोज हजारो भाविक येतात. आलेले भाविक देवाला हार, फुले वाहतात. मंदिर समितीकडे दररोज अंदाजे एक ते दीड टन निर्माल्य जमा होते. यापुढे या निर्माल्यापासून अगरबत्ती व धूप तयार करण्यात येणार असल्याची माहिती कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी दिली.
मंदिरात जमा होणारे निर्माल्य एक खासगी व्यक्ती स्वखर्चाने घेऊन जाणार आहे. त्या निर्माल्यापासून अगरबत्ती व धूप तयार करणार आहे. तयार झालेली अगरबत्ती व धूप विक्रीतून जमा होणारी २० टक्के रक्कम मंदिर समितीला देणार आहे.
शासकीय महापूजेवेळी गाभा-यातील उपस्थितांच्या संख्येबाबत जिल्हा प्रशासनाचे अभिप्राय घेणे, गाभारा, तसेच विठ्ठल सभामंडप, बाजीराव पडसाळी येथील सर्व कामे ३० जूनपूर्वी पूर्ण करणे, मंदिर समितीच्या सन २०२४-२५ च्या ७६ कोटीच्या अंदाजपत्रकास मंजुरी, मंदिर समितीच्या जमिनी खंडाने देण्याबाबत लिलाव प्रक्रिया राबविणे,
तसेच १५ व्या वित्त आयोगांतर्गत आयुष्यमान आरोग्य मंदिरासाठी श्रीसंत ज्ञानेश्वर दर्शन मंडप व श्री विठ्ठल-रुक्मिणी भक्तनिवास येथे मोफत जागा उपलब्ध करून देण्याचे ठरले. त्यामुळे भाविक व नागरिकांना आरोग्य सेवा उपलब्ध होणार असल्याचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी सांगितले.