सोलापुरात विधानसभा निवडणुकीपूर्वी शहरांतील’ या ’11 पोलिस चौक्या सूरू होणार!

मे १९९२ मध्ये हद्दवाढ भाग समाविष्ट झाल्यानंतर सोलापूर शहराचे क्षेत्रफळ १८०.६७ चौरस किलोमीटरपर्यंत वाढले. पण, शहरातील पोलिस ठाण्यांची संख्या सातच आहे. त्याअंतर्गत २४ पोलिस चौक्या आहेत, पण त्याही काही वर्षांपासून कुलूपबंद आहेत.आता पोलिस आयुक्त एम. राज कुमार यांनी नागरिकांच्या सोयीसाठी काही चौक्या सुरू करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. विधानसभा निवडणुकीपूर्वी ११ चौक्या तर १५ ऑगस्ट रोजी दोन चौक्या उघडल्या जाणार आहेत. त्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचेही नियोजन आहे.
सोलापूर शहराची लोकसंख्या सध्या ११ लाखांपेक्षा अधिक आहे, पण शहर पोलिसांचे मनुष्यबळ मर्यादितच आहे. शहराचा विस्तार झाल्याने पोलिसांची हद्द व जबाबदारीही वाढली आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांची गैरसोय होऊ नये, अडचणीवेळी त्यांना तत्काळ मदत मिळावी या हेतूने कुलूपबंद पोलिस चौक्या आता सुरू केल्या जात आहेत. बाळे, रेल्वे स्टेशन, मंगळवार पेठ अशा अत्यावश्यक ठिकाणच्या चौक्या पहिल्या टप्प्यात सुरू होतील. विधानसभा निवडणुकीपूर्वी म्हणजेच साधारणत: १५ सप्टेंबरपर्यंत शहरातील प्रमुख ११ पोलिस चौक्या पुन्हा सुरू केल्या जाणार असून, निवडणुकीनंतर प्रत्येक आठवड्याला एक याप्रमाणे नागरिकांची गरज व मनुष्यबळाची उपलब्धता पाहून उर्वरित चौक्या सुरू होतील, असेही पोलिस आयुक्तालयाचे नियोजन आहे.
शहरातील मरिआई पोलिस चौकी व सम्राट पोलिस चौकी १५ ऑगस्ट रोजी सुरू केली जाणार आहे. पोलिस आयुक्तांच्या मार्गदर्शनाखाली विधानसभा निवडणुकीपूर्वी शहरातील २४ पैकी ११ पोलिस चौक्या सुरू करण्याचे नियोजन झाले आहे. निवडणुकीनंतर मनुष्यबळ उपलब्ध होईल, त्यानंतर उर्वरित पोलिस चौक्या सुरू होतील.पोलिस ठाणे दूरवर असलेल्या भागातील नागरिकांच्या सोयीसाठी, त्यांना पोलिसांची मदत लवकरात लवकर मिळावी म्हणून शहरातील आवश्यक त्या पोलिस चौक्या पुन्हा एकदा उघडल्या जाणार आहेत. त्या ठिकाणी गरजेनुसार दोन-तीन कर्मचारी नेमले जातील. पण, त्या ठिकाणी तक्रार किंवा गुन्हा दाखल करण्याची सोय नसेल. तक्रार किंवा फिर्याद द्यायला नागरिकांना पोलिस ठाण्यातच यावे लागणार आहे.