प्रत्येक ठिकाणी अलीकडच्या या काळात गुन्हेगारीच्या प्रकारात खूपच वाढ झाल्याचे चित्र दिसत आहे. यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. या गुन्हेगारीमुळे नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना दिसून येत आहे. मंगळवेढा तालुक्यासह शहरात बेकायदेशीररीत्या खासगी सावकारी करणाऱ्यांनी उच्छाद मांडला आहे. बेरोजगार युवक या व्यवसायामध्ये मोठ्या प्रमाणात घुसले असून दिवसाला, आठवड्याला, महिन्याला सुमारे २० ते ४० टक्के व्याजाने रक्कम देऊन पठाणी वसुली केली जात असल्याचे समोर येत आहे
.मंगळवेढा तालुक्यात सुमारे ३०० खासगी सावकार आहेत. त्यामध्ये केवळ २२ सावकार लायसन्स धारक आहेत. बँकेकडून कर्ज मिळण्यात येणाऱ्या अडचणीमुळे गरजू छोटेमोठे व्यावसायिक, युवक, महिला मात्र सावकारांना बळी पडत आहेत. सावकाराच्या भीतीपोटी अनेकांनी गावे सोडली असून या अवैध सावकारीला आळा घालण्याची मागणी नागरिकांमधून होत आहे.
मंगळवेढा येथील एमआयडीसीमध्ये रोजगाराच्या फारशा संधी उपलब्ध नाहीत, त्यामुळे येथील अनेक युवक वर्ग दोन नंबर धंद्याकडे वळत आहेत. गेल्या काही दिवसांपासून मंगळवेढा शहर व ग्रामीण भागात अवैध खासगी सावकारी वाढू लागली आहे. या खासगी सावकारीच्या माध्यमातून गरजू व्यावसायिक युवक यांना मागेल तशी रक्कम घेऊन त्यांच्याकडून जमीन लिहून घेणे, गाड्या ताब्यात घेणे, कोरे चेक घेणे असे प्रकार वाढत आहेत.
हे कर्ज देताना संबंधित कर्जदाराला २० ते ४० टक्के व्याजदराने दिवसाला, आठवड्याला किंवा महिन्याला हप्ते पाडून ही रक्कम दिली जाते. वसुलीसाठी या खासगी सावकारांची यंत्रणा अतिशय तगडी असून व्याजाला एक दिवस देखील पुढे जाऊ दिले जात नाही,
एखाद्याने व्याज व मुद्दल देण्यास उशीर केल्यास त्या संबंधित कर्जदाराला शिवीगाळ, मारहाण करणे असे प्रकार होत असतात. एखाद्या कर्जदाराने संबंधित खासगी सावकारा विरोधात तक्रार दिल्यास संबंधित यंत्रणा देखील मॅनेज केले जाते. कर्जदाराकडून सुरुवातीला काही ठराविक हप्ते वेळेवर दिले जातात. परंतु त्यानंतर आर्थिक चक्र थंडावल्याने व्याजाचे मुदलाचे हप्ते वेळेवर दिले जात नाहीत.
त्यामुळे कर्जदाराने लिहून दिलेल्या संपत्तीवर सावकाराकडून टाच आणली जाते. मंगळवेढा शहरात आठवड्याला सुमारे कोट्यावधीची उलाढाल खासगी सावकारी च्या माध्यमातून होत असल्याचे बोलले जात आहे. अवैधरित्या चालणाऱ्या सावकारकीला आळा घालणे आवश्यक असून याप्रकरणी पोलीस व सहाय्यक उपनिबंधक कार्यालयाने कारवाई ची पावले उचलणे गरजेचे आहे.
खासगी सावकाराच्या विरोधात तक्रार
दोन दिवसांपूर्वी मंगळवेढा येथील एका व्यक्तीने खासगी सावकाराच्या विरोधात तक्रार दिली होती. त्या अनुषंगाने शहरातील 10 ते 12 खासगी सावकारी करणाऱ्यांना पोलिसांनी बोलावून चौकशी केल्याची माहिती आहे.