मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा उद्याचा कोल्हापूर दौरा रद्द!

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी (CM Eknath Shinde In Kolhapur) उद्याचा (25 जून) कोल्हापूर दौरा रद्द केला आहे. कोल्हापुरातील श्वाश्वत परिषदेला ते कोल्हापुरात येणार होते. मात्र, मुख्यमंत्री शिंदे यांचा दौरा निश्चित झाल्यापासून वादात सापडला आहे.

कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातून नागपूर ते गोवा शक्तीपीठ महामार्गाला होत असलेल्या कडाडून विरोधामुळे शेतकऱ्यांनी मुख्यमंत्री शिंदे यांना मोर्चाने जात जाब विचारण्याचा इशारा दिला होता. कोल्हापूर हद्दवाढ आणि सर्किट बेंच मुद्यावर उद्या कोल्हापूर बंदची हाक देण्यात आली होती.

या सर्व पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कोल्हापूरचा दौरा रद्द केला आहे. मुख्यमंत्री उद्या 25 जून रोजी कोल्हापूरमध्ये शाश्वत परिषदेसाठी येणार होते.प्रत्यक्ष कोल्हापूरला येण्याची टाळून एक प्रकारे राजकीय वादापासून लांब राहण्याचा प्रयत्न केला आहे. शाश्वत परिषदेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ऑनलाईन उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे संघर्ष टाळण्याचा प्रयत्न मुख्यमंत्र्यांकडून करण्यात आला आहे.

शक्तीपीठ महामार्गाला शेतकऱ्यांकडून कडाडून विरोध सुरू आहे. शिंदे यांनी या मार्गाचे फेर सर्वेक्षण करण्याचे सुतोवाच करताना रद्द करणार नसल्याचे स्पष्ट केले होते. त्यामुळे कोल्हापुरातील शेतकरी आक्रमक झाले आहेत. हजारो शेतकऱ्यांनी मोर्चाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जाब विचारण्याचा निर्णय घेतला होता.