इचलकरंजी येथील रिक्रिएशन हॉल शेजारी असलेल्या तांबे सरांच्या श्रद्धा अकॅडमी या शिक्षण संस्थेच्या विद्यार्थिनींना मेस व हॉस्टेलच्या जबरदस्तीसाठी दोन शिक्षिकांकडून मारहाण झाल्याचा खळबळजनक प्रकार उघडकीस आला. याचा जाब विचारत संतप्त पालकांनी श्रद्धा अकॅडमीमध्ये गोंधळ घातला. शहरात निघालेल्या अकॅडमीग्रस्त शैक्षणिक संस्थांची शासकीय स्तरावर चौकशी व्हावी अशी मागणी पालक वर्गातून होत आहे.
श्रद्धा या शिक्षण संस्थेने इचलकरंजी शहरात अनेक ठिकाणी आपल्या शाखा सुरू केल्या आहेत. तसेच मेस व हॉस्टेलसाठी ही यांच्याच स्वतंत्र इमारती, टिफिन आदींची सोयही आहे. पण या सेवा बाहेरील पेक्षा महागड्या व निकृष्ट दर्जाच्या असतात. म्हणून काही विद्यार्थी तसेच विद्यार्थिनी खाजगी ठिकाणी रूम व जेवणाची सोय स्वतंत्रपणे करतात.
सामाजिक कार्यकर्त्या पद्मजा इंगवले यांच्या घराशेजारी असणाऱ्या खाजगी हॉस्टेलमध्ये दोन दिवसांपूर्वी होस्टेलचे घर मालक नसताना विद्यार्थिनींना संस्थेच्या दोन महिला सेवकांनी त्या राहत असलेल्या ठिकाणी जाऊन विद्यार्थिनींचे साहित्य विस्कटून विद्यार्थिनींना मारहाण केली. तुम्ही खाजगी होस्टेलमध्ये का राहता अकॅडमीच्या होस्टेलमध्ये राहिलं पाहिजे अशी धमकी वजा दम दिला. यामुळे विद्यार्थिनींच्या मनात भीती निर्माण झाली. दरम्यान सुप्रिया कौंदाडे व पवार मॅडम यांनी विद्यार्थिनींना केस ओढून मारहाण करत अकॅडमीमध्ये नेले.
विद्यार्थिनींनी तात्काळ हा प्रकार आपल्या घरी कळवला पालकांनीही या ठिकाणी धाव घेऊन याचा जाब विचारत गर्दी केली. यामुळे श्रद्धा क्लासेस असलेल्या रिक्रिएशन हॉल परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
खाजगी शिक्षण संस्थेच्या या मनमानी कारभाराविरुद्ध तसेच विद्यार्थिनींच्या मारहाणीविरुद्ध गुन्हा दाखल करून योग्य ती कारवाई करावी अन्यथा पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर उपोषण व आत्मदहन करण्याचा इशारा सामाजिक कार्यकर्त्या पद्मजा इंगवले यांनी प्रांताधिकारी कार्यालयात निवेदनाद्वारे दिले आहे.