कोल्हापूर आणि सांगलीचा महापुराचा त्रास कायमचा बंद करणार, अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शुक्रवारी महिला सशक्तीकरण अभियानांतर्गत कोरोची (ता.हातकणंगले) येथे आयोजित महिला मेळाव्यात दिली. हे अभियान राज्यातील दोन कोटी महिलांच्या आयुष्यात क्रांती घडवेल, असा विश्वासही व्यक्त करत शहरात महिला सुरक्षा अभियान सुरू केले जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
यंत्रमागांना वीज सवलत देण्याची घोषणा त्यांनी केली.पंचगंगा प्रदूषण रोखण्याबरोबरच कोल्हापूर खंडपीठाचा प्रश्नही लवकरच निकाली काढू, असे सांगत शेतकर्यांकडून केली जाणारी 200 पट पाणीपट्टी वसुलीला स्थगिती देत असल्याची घोषणाही त्यांनी केली.मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, ताराराणींनी अतुलनीय शौर्य गाजवून मराठा साम-ाज्याचे, माता-भगिनींचे रक्षण केले.
राज्यकारभारात जनसेवेत आदर्श निर्माण करून अहिल्यादेवी होळकर यांनी आपला ठसा उमटवला, सावित्रीबाई फुले यांनी देशात स्त्री शिक्षणाचा पाया रोवला. त्यांचेच आपण वारसदार आहोत, याचा सार्थ अभिमान आहे. महिला आता अबला नाही, त्या सबला आहेत. रणरागिणी आहेत. त्यांच्या नादाला कुणी लागू नये. राज्यात महिला सुरक्षित राहाव्यात म्हणून महिला धोरण जाहीर केले.