डेंग्यूप्रश्‍नी कबनूर सरपंचांना निवेदन!

सध्या डेंग्यूचे रुग्ण अनेक ठिकाणी सापडत आहेत. आळते या गावात भरपूर रुग्ण सापडल्यामुळे नागरिकांच्या मनात भीती निर्माण झाली आहेच अशातच इचलकरंजी शहरात देखील डेंग्यूचे रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे नागरिक योग्य ती काळजी घेताना दिसत आहे. कबनूर येथील सत्यराजनगर, आभार फाटा, फरांडे मळा परिसरामध्ये सध्या डेंग्यूचे रुग्ण आहेत.

येथे जलस्वराज्य प्रकल्पाजवळ असणाऱ्या गणेश तलावामध्ये मोठ्या प्रमाणात डेंग्यूच्या अळ्या आढळल्याने तो खड्डा लवकरात लवकर बुजवावा, वॉशआऊट पाणी जाण्यासाठी जमिनीतील पाईपशी जोडून ते पाणीसुद्धा वाहते करावे, अन्यथा येत्या १ जुलैला या खड्ड्यामध्ये जलसमाधी आंदोलन करण्यात येईल असा इशारा येथील दत्तात्रय तानाजी शिंदे व उत्तम अण्णाप्पा जाधव यांनी दिला.याबाबतचे निवेदन सरपंच शोभा पोवार यांना देण्यात आले.

निवेदनात म्हटले आहे, पावसाळा असल्याने त्या दोन्ही खड्ड्यांसमोर असणाऱ्या दलित वस्तीला त्रास होतो. तसेच त्या ठिकाणी लहान मुले खेळण्यासाठी, पोहण्यासाठी मोठ्या प्रमाणात येत असल्याने लहान मुलांच्या जीवितास धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता आहे. याचा विचार करून हा खड्डा तत्काळ बुजवावा.