पावसाळ्याची मजा डबल करण्यासाठी घरच्या घरी बनवा क्रिस्पी कॉर्न भजी!

पावसाळा हा ऋतू सुरु झाला आहे. पावसाळ्यात सर्वात जास्त कोणत्या खाद्यपदार्थाची आठवण येत असेल तर ते म्हणजे भजी. पावसाळ्याच्या थंड वातावरणात गरमा गरम भजी खाण्याचा आनंद म्हणजे जणू स्वर्गच! भजी अनेक प्रकारचे बनवले जातात जसे की कांदा भजी, बटाटा भजी, मिरची भजी मात्र आज आम्ही तुम्हाला मक्याचे भजी कसे तयार करायचे याची एक सोपी रेसिपी सांगणार आहोत.

या ऋतूत बाजारात मके सर्वत्र उपलब्ध असतात. पावसाळ्यात तुम्ही भाजलेला मका तर बऱ्याचदा खाल्ला असेल मात्र मक्याचे कुरकुरीत भजी खाल्ले नसतील तर ही रेसिपी वाचा आणि लगेच बनवून पहा. ही रेसिपी अगदी कमी वेळेत आणि कमी साहित्यांपासून बनवली जाते. चला तर पाहुयात कॉर्न भजी बनवण्यासाठी लागणारे साहित्य आणि कृती.

साहित्य

4 ताजे मऊ कॉर्न
1 कप बेसन
1 कांदा (बारीक चिरलेला)
हिरवी मिरची
आलं-लसूण
लाल तिखट
चिमूटभर हिंग
मीठ चवीनुसार
कोथिंबीर
तेल तळण्यासाठी

कृती

क्रिस्पी कॉर्न भजी बनवण्यासाठी सर्वप्रथम मका चांगला धुवून याचे दाणे काढून घ्या
यानंतर मिक्सरच्या भांड्यात हे मक्याचे दाणे, हिरव्या मिरच्या, आल्याचा लहान तुकडा, 3-4 लसूण पाकळ्या टाकून याची एक भरड पेस्ट तयार करून घ्या
आता ही पेस्ट एका भांड्यात काढून यात उभा चिरलेला कांदा, हिंग, लाल तिखट, बेसन आणि चिरलेली कोथिंबीर घालून सर्व साहित्य नीट एकजीव करून घ्या
आता बाजूला गॅसवर एक कढई ठेवून त्यात तेल टाका आणि तेल गरम झाले की यात तयार पिठाचे लहान लहान भजी काढून छान कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्या
लक्षात ठेवा, हे भाजी तुम्हाला मध्यम आचेवर तळायचे आहेत
आता हे तयार भजी सॉस किंवा पुदिन्याच्या चटणीसोबत खाण्यासाठी सर्व्ह करा