सध्या खरीप पेरणीची लगबग सुरू असून खते, बियाणे, कीटकनाशकांच्या खरेदीसाठी शेतकरी कृषी सेवा केंद्रांवर जात आहे. शेतकऱ्यांना मुदतबाह्य खते-औषधे, बियाणांची विक्री, लिंकिंगचा आग्रह, खते असूनही नाही म्हणून सांगण्याचे प्रकार समोर येत आहेत. या पार्श्वभूमीवर कृषी विभागाने सोलापूर जिल्ह्यातील १५ खत दुकानांचा परवाना कायमचा रद्द केला असून दोघांचा परवाना निलंबित केला आहे.
खते, बियाणे, कीटकनाशकांची विक्री करणाऱ्या कृषी सेवा केंद्र चालकांना दर्जेदार निविष्ठांच्या विक्रीसंदर्भात सक्त सूचना देण्यात आल्या आहेत. कृषी सेवा केंद्रांच्या तपासणीसाठी भरारी पथके नेमली असून त्यांच्या माध्यमातून जूनअखेर राज्यातील ८०० हून अधिक दुकानांचा परवाना रद्द तर २४१ जणांचे परवाने निलंबित केले आहेत.