लोकसभेला एकत्र मात्र विधानसभेला…..

समरजीत घाटगे यांनी विधानसभेचे रणशिंग फुंकले आहे. ते राधानगरी धरण येथे राजर्षी छत्रपती शाहू महाराज जयंती निमित्त आयोजित केलेल्या उत्सवात बोलत होते. यामुळे येत्या काळात कागल विधानसभा मतदारसंघातून पुन्हा हसन मुश्रीफ विरुद्ध समरजीतसिंह घाटगे असा सामना अटळ आहे. राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचे जनक घराण्याचे वंशज व भाजप नेते समरजीतसिंह घाटगे आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते हसन मुश्रीफ यांच्यातील राजकीय वैर संपूर्ण जिल्ह्याला सर्वश्रुत आहे.

अशातच भाजप शिवसेनेसोबत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट देखील आल्याने कागल विधानसभा मतदारसंघातील हे दोन कट्टर विरोधक म्हणजे एका म्यानात दोन तलवारी असे झाले. राज्यात महायुती असल्याने या दोन्ही नेत्यांनी लोकसभेत महायुतीचा उमेदवार निवडून यावा यासाठी प्रयत्न केला. यासाठी अनेक कार्यक्रमांना एकाच व्यासपीठावर देखील आले. मात्र लोकसभा निवडणुका संपताच आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या दोन्ही नेत्यांनी विधानसभेसाठी तयारी सुरू केली आहे.